Join us

36 वर्षांनी प्रशांत दामले-वर्षा उसगांवकर आले एकत्र; निमित्त ‘सारखं काहीतरी होतंय’चे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:51 IST

आचार्य अत्रेंच्या ‘ब्रम्हचारी’ या गाजलेल्या नाटकात ही जोडी एकत्र दिसली होती. आता ३६ वर्षांनी पुन्हा एकदा रसिकांना या जोडीची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे.

मुंबई :  दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ना काही कमी अधिक घडत असते. माझी सर्व नाटके त्यावर आधारलेली असतात आणि ‘सारखं काहीतरी होतंय’ हे नवे नाटकही कौटुंबिक जिव्हाळ्याचे असल्याचे अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितले. या नाटकाच्या निमित्ताने ३६ वर्षांनी पुन्हा प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर ही जोडी एकत्र आली आहे. पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तीन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी भेट होत असल्याचा आनंदही प्रशांत यांनी व्यक्त केला. आचार्य अत्रेंच्या ‘ब्रम्हचारी’ या गाजलेल्या नाटकात ही जोडी एकत्र दिसली होती. आता ३६ वर्षांनी पुन्हा एकदा रसिकांना या जोडीची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. आई-वडील आणि मुलांमधील नातेसंबंध दर्शवणारे हे नाटक आहे. घराघरात चर्चिले जाणारे मुले आणि आई-वडिलांमधील महत्त्वाचे मुद्देही यात असून, मातृत्वाच्या विषयालाही हे नाटक स्पर्श करणारे असल्याचे दामले यांनी सांगितले.वर्षा उसगावकर म्हणाल्या, माझ्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासूनच झाली होती. प्रशांतसोबतची माझी जोडी त्या काळी प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर पुन्हा प्रशांतसोबत एखादे नाटक करण्याची इच्छा होती, पण योग जुळून आला नाही. आयुष्याच्या या वळणावर पुन्हा एकदा आमची रोमँटिक जोडी रसिकांसमोर येत आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. या आधी संकर्षणला प्रमुख भूमिकेत सादर करणाऱ्या दामलेंनीच त्याला या नाटकाच्या निमित्ताने दिग्दर्शनाची संधी दिली आहे. निखिल खैरे यांच्या संकल्पनेवर आधारलेल्या या नाटकाची प्रोसेस लॅाकडाऊनच्या काळात सुरू झाल्याचे संकर्षणने सांगितले. पूर्णिमा अहिरे, सिद्धी घैसास, राज देशमुख यांच्याही भूमिका असलेल्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २५ मार्च रोजी होणार आहे.

टॅग्स :प्रशांत दामलेवर्षा उसगांवकर