१० वर्ष कारावासानंतर मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १४ वर्षांनी मिळाला जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 06:27 IST2026-02-11T06:27:25+5:302026-02-11T06:27:59+5:30
न्यायालयाने शेख याची १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच त्याच रकमेच्या एक किंवा अधिक जामिनदारांच्या अटीवर सुटका करण्याचे आदेश दिले

१० वर्ष कारावासानंतर मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १४ वर्षांनी मिळाला जामीन
मुंबई - २०११ च्या मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी नदीम अख्तर शेख याला अटक झाल्यानंतर तब्बल १४ वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. जानेवारी २०१२ मध्ये अटक झाल्यापासून खटला प्रलंबित असताना आपण दशकभराहून अधिक काळ तुरुंगात असल्याचा दावा शेखने केला होता. तसेच, नजीकच्या काळात खटला पूर्ण होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे त्याने न्या. अजय एस. गडकरी आणि न्या. श्याम सी. चांडक यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले.
न्यायालयाने शेख याची १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच त्याच रकमेच्या एक किंवा अधिक जामिनदारांच्या अटीवर सुटका करण्याचे आदेश दिले. यापूर्वी, मे २०२२ मध्ये विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शेख याने दीर्घकालीन कारावासाचा मुद्दा उपस्थित करीत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १३ जुलै २०११ रोजी दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाउस परिसरात झालेल्या तीन स्फोटांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणात तपास यंत्रणांनी ११ जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
याच प्रकरणातील एकाला १३ वर्षांनी जामीन
याआधी, नोव्हेंबर २०२५ मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी कफील अहमद (वय ६५) याला सुमारे १३ वर्षांनी जामीन मंजूर केला होता. तर एक कथित हवाला ऑपरेटर कवल पथरेजा याचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाला. हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेला इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या यासीन भटकळ हासुद्धा या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींपैकी एक आहे.
एटीएसचा दावा काय?
एटीएसच्या म्हणण्यानुसार, अहमद आणि शेख यांना अटक केल्यानंतर त्यांनी तपास यंत्रणेला भायखळा येथील भाड्याच्या घरापर्यंत नेले, जिथे बॉम्ब तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. अहमदने त्या घराच्या बनावट चाव्या तसेच स्फोटात वापरण्यात आलेल्या दोन चोरीच्या स्कूटरच्या चाव्या दिल्याचा दावा एटीएसने केला आहे. एटीएसच्या म्हणण्यानुसार, भटकळने अहमद आणि शेख यांच्या मदतीने हे घर भाड्याने
घेतले होते.