Join us

ठाण्यातील कोरोना रुग्णांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 16:42 IST

कोरोना रुग्णालयात डाॅक्टर नर्सची वानवा ; स्वॅब टेस्टसाठी किट मिळेना, वॉर्डबॉय, सफाई कर्मचा-यांनी काढला पळ

 

संदीप शिंदे

मुंबई - स्वॅब टेस्ट करण्यासाठी किट मिळत नाही, दिवसागणीक वाढणा-या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसे डॉक्टर आणि नर्स उपलब्ध नाही, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचा-यांसह रुग्णांचे कपडे धुणा-या कामगारांनी तर कोरोनाच्या दहशतीमुळे अक्षरश: पळ काढला आहे. ही अवस्था सरकारी नव्हे तर ठाणे महापालिकेने कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी सज्ज ठेवलेल्या होरायझन प्राईम या रुग्णालयाची आहे. सरकारी रुग्णालयांतील गैरसोय टाळण्यासाठी इथे दाखल झालेल्या रुग्णांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांवर खासगी रुग्णालयांत उपचार करताना अन्य रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचा-यांनाही बाधा होते. त्यामुळे सरकारच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी घोडबंदर रोड येथील होरायझन हॉस्पिटलची निवड केली. मात्र, इथे कोरोना रुग्ण उपचारांसाठी येणार हे समजल्यानंतर कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचा-यांनी पळ काढला आहे. आजच्या घडीला या ठिकाणी कोरोनाचे निदान झालेले २० रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जेमतेम तीन डॉक्टर उपलब्ध असतात. नर्सची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्याशिवाय इथल्या रुग्णांचे कपडे धुण्याचा ठेका असलेल्या ठेकेदारानेही पळ काढल्याने मोठी पंचाईत झाली आहे. सुदैवाने सध्या इथे उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी कुणाचीही प्रकृती चिंताजन नाही. मात्र, इथली रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना डॉक्टरपासून लॉण्ड्री कर्मचा-यांपर्यंतची वानवा चिंताजनक आहे. 

स्वॅब टेस्टसाठी किट मिळेनाया रुग्णालयांत सहा दिवसांपुर्वी दाखल झालेल्या एका महिला रुग्णाची प्रकृती आता सुधारली आहे. नियमानुसार पुन्हा शनिवारी त्यांची तपासणी अभिप्रेत होती. मात्र, स्वॅब टेस्ट किट गेल्या दोन दिवसांपासून उपलब्धच होऊ शकलेले नाही. ठाण्यातील तीन खासगी लॅबला तपासणीची परवानगी देण्यात आली असली तरी किट सोमवारी मिळू शकेल असे उत्तर त्यांच्याकडून रुग्णालयाला देण्यात आले. वाढती रुग्णसंख्या आणि मर्यादीत तपासणी केंद्रांमुळे ही समस्या निर्माण होत आहे. पालिकेची स्वतंत्र लॅब तयार करण्याचे काम सुरू असून ते येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल अशी माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.-------- 

वैद्यकीय कर्मचा-यांना नोटीसा धाडणार

होरायझन हॉस्पिटलची ही कोंडी फोडण्यासाठी इथले गैरहजर डॉक्टर आणि नर्सना पालिका नोटीसा धाडणार आहे. २४ तासांच्या आत जर ते कामावर हजर झाले नाहीत तर त्यांचे परवाने रद्द केले जातील. साथरोग नियंत्रण कायद्यान्वये तसे अधिकार पालिकेला असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली.

 

टॅग्स :आरोग्यकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस