Join us  

सोहराबुद्दीन शेखचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी होता थेट संबंध, जेठमलानींचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 9:27 AM

सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणी वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणी वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी गंभीर आरोप केले आहेत. ''सोहराबुद्दीन हा एक दहशतवादी होता. त्याचे थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध होते. भारतात दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी सोहराबुद्दीनला दाऊदकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रदेखील पुरवण्यात आले होती'', असा गंभीर आरोप महेश जेठमलानी यांनी केला आहे. ''सोहराबुद्दीन व त्याचा साथीदार प्रजापती हे दोन्ही वॉन्टेड दहशतवादी होते. या दोघांविरोधातही कित्येक गुन्हे दाखल आहेत. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशचे पोलीस दोघांच्या मागावर होते. त्यामुळे कदाचित पकडले गेल्यावर पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याचा चकमकीत मृत्यू झाल्याचा बनाव तत्कालीन सीबीआयच्या वतीने करण्यात आला. कारण, तेव्हाची सीबीआय ही आजच्या इतकी निष्पक्ष नव्हती'', असेही त्यांनी सांगितले. सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणावरील मुंबई हायकोर्टातील सुनावणीदरम्यान त्यांनी हा आरोप केला.यावर ''सध्याची सीबीआय हायकोर्टाला सहकार्य करत नाही का'' याचा पुनरुच्चार न्यायमूर्ती रेवती मोहीते-डेरे यांच्या खंडपीठाकडून करण्यात आला.

''कथित सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटरच्या काळातील सीबीआय ही राजकीय हेतूने प्रेरित होत'', असा खळबळजनक आरोप याप्रकरणी निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या राजकुमार पंडियन यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. वरिष्ठ वकील महेश जेठमलानी हे पंडियन यांच्या वतीने युक्तिवाद करत आहेत. तत्कालीन आयपीएस अधिकारी राजकुमार पंडियन यांच्यावर सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी  आणि साथीदार तुलसीराम प्रजापती यांचं अपहरण करुन त्यांच्या बनावट चकमकीत हत्या केल्याचा आरोप होता. मात्र सबळ पुराव्यांअभावी त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

टॅग्स :दहशतवाददाऊद इब्राहिम