Andheri Adulterated Milk Racket: मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा एक अत्यंत भयानक प्रकार समोर आला आहे. अंधेरी पश्चिम येथील कपासवाडी परिसरात स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी छापा टाकून बनावट दूध तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. चक्क डिटर्जंट पावडर, युरिया आणि रिफाईंड तेल वापरून हे पांढरे विष तयार केले जात असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्तीकडे अनेक नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या सापडल्या आहेत.
व्हायरल व्हिडिओने उडवली झोप
या प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका खोलीत दुधाच्या पिशव्यांचा खच पडलेला दिसत आहे. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला हे बनावट दूध कसे बनवले जाते, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितले जात आहे. तो व्यक्ती मेणबत्तीच्या दिव्यावर काही रसायने गरम करून दुधात भेसळ करण्याची प्रक्रिया दाखवताना दिसत आहे. स्थानिकांच्या मते, हे रॅकेट बऱ्याच दिवसांपासून सुरू असण्याची शक्यता आहे.
असे बनवले जाते 'सिंथेटिक' दूध
तपासातून समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. हे माफिया दुधाला नैसर्गिक दिसणारा फेस आणि पांढरेपण आणण्यासाठी त्यात घातक डिटर्जंट पावडर आणि साबणाच्या द्रावणाचा वापर करतात. इतकेच नव्हे तर, दूध घट्ट दिसावे आणि त्यातील प्रथिनांचे प्रमाण योग्य असल्याचे भासावे यासाठी त्यात युरिया आणि इतर घातक सिंथेटिक रसायने मिसळली जातात. दुधातील स्निग्धता म्हणजेच फॅट्स वाढवून दाखवण्यासाठी स्वस्त रिफाईंड तेलाचा वापर केला जातो. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या १ लिटर मूळ दुधात पाणी, पांढरा रंग आणि या विषारी रसायनांचे मिश्रण करून त्याचे प्रमाण चक्क दुप्पट म्हणजे २ लिटर केले जाते, जेणेकरून कमी खर्चात जास्तीत जास्त कमाई करता येईल.
पुरवठा साखळीवर प्रश्नचिन्ह
हे दूध डेअरी केंद्रातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. माफिया हे दुधाचे अधिकृत बॉक्स मधल्या मार्गातच गायब करतात. त्यानंतर एका खासगी ठिकाणी नेऊन पिशव्या फोडल्या जातात, त्यात भेसळ केली जाते आणि पुन्हा नवीन पिशव्यांमध्ये पॅक करून ते घरोघरी पुरवले जाते. विशेषतः अंधेरीतील सोसायट्यांमध्ये हे दूध खुलेआम विकले जात होते.
आरोग्यावर गंभीर परिणाम
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, असे रासायनिक आणि विषारी दूध पिणे म्हणजे एक प्रकारे हळूहळू मृत्यूलाच निमंत्रण देण्यासारखे आहे. या भेसळयुक्त दुधामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर सर्वात गंभीर परिणाम होत असून त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अशा दुधामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी प्रचंड प्रमाणात घटू शकते, ज्यामुळे हाडांचे आजार बळावतात. याव्यतिरिक्त, दीर्घकाळ अशा दुधाचे सेवन केल्यास किडनी निकामी होणे, यकृताचे गंभीर आजार जडणे, पोटाचे कायमस्वरूपी विकार उद्भवणे तसेच त्वचा रोग आणि डोळ्यांचे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
FSSAI चे आदेश आणि कारवाईची मागणी
काही दिवसांपूर्वीच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशभर दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबईत समोर आलेले हे प्रकरण प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर बोट ठेवणारे आहे. नेटकऱ्यांनी या दूध माफियांवर कडक कारवाई करून त्यांना मोठी शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
Web Summary : A fake milk racket using detergent, urea, and refined oil was exposed in Andheri. Adulterated milk, packaged in branded pouches, was supplied to societies, posing severe health risks, including organ damage, especially to children and women. Authorities are urged to take strict action.
Web Summary : अंधेरी में डिटर्जेंट, यूरिया और रिफाइंड तेल का उपयोग करके नकली दूध रैकेट का भंडाफोड़ हुआ। ब्रांडेड पाउच में पैक किया गया मिलावटी दूध सोसायटियों में सप्लाई किया जा रहा था, जिससे बच्चों और महिलाओं सहित स्वास्थ्य को गंभीर खतरा है। अधिकारियों से सख्त कार्रवाई का आग्रह किया गया है।