Join us

तुम्ही अजून लहान आहात, आमचा अपमान केलात तर...; आदित्य ठाकरेंना शिंदे गटाकडून 'समज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 13:56 IST

दीपक केसरकर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत दादा भुसे, संदीपान भुमरे आणि संजय राठोड उपस्थित होते

मुंबई - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर संघटनेला सावरण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या शिवसंपर्क अभियानातून बंडखोरांवर जोरदार निशाणा साधत आहेत. आदित्य ठाकरेंकडून सातत्याने गद्दार असा उल्लेख करत शिवसेना आमदांना लक्ष्य केलं जात आहे. आदित्य यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तुम्ही अजून लहान आहात आणि प्रादेशिक अस्मिता काय असते हे तुम्हाला ठावूक नाही. त्यामुळे आम्ही हाडाचे शिवसैनिक असून टीका करताना जरा विचार करुन बोला, असं म्हटलं. 

दीपक केसरकर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत दादा भुसे, संदीपान भुमरे आणि संजय राठोड उपस्थित होते. यावेळी, त्यांनी विविध मुद्द्यांवरुन आदित्य ठाकरेंनी संयम बाळगावा असे सांगत अनेक उदाहरणं दिली. तसेच, केवळ शिवसेनेच्या तिकीटावरच नाही, तर उमेदवाराची मेहनत आणि कामही असतं, असं ते म्हणाले. उमेदवारांमुळेही पक्षाच्या सीट निवडून येत असतात. कोणत्याही विभागाच्या स्थानिक अस्मितेला आव्हान देऊ नका. उत्तर महाराष्ट्रात दादा भुसेंचं स्थान आहे, औरंगाबादेत संदीपान भुमरेंना मानणारे लोकं आहेत. तर, यवतमाळमध्ये संजय राठोड यांच्या पाठिशी संपूर्ण बंजारा समाज आहे. तुम्ही अजून लहान आहात, अशा शब्दात दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, प्रादेशिक अस्मिता काय असते याची तुम्ही कल्पना नाही. इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरुंसारख्यांना याचा अनुभव आलाय. इंदिरा गांधींच्या काळात प्रादेशिक अस्मितेला ठेस पोहोचली, तेव्हा दक्षिणेतलं काँग्रेसचं राज्य निघून गेलं. तेव्हा एनटी रामाराव तिथं उभे राहिले, असे अनेक उदाहरणं आहेत. महाराष्ट्रात सहा विभाग असून प्रत्येकाची स्वतंत्र अस्मिता आहे, असे म्हणत केसरकर यांनी आदित्य यांना सुनावलं. तसेच, आदित्य यांनी उद्धव ठाकरेंचं उदाहरण घेऊन भाषणं करावीत, असेही ते म्हणाले. 

आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा निम्म्या वयाचे

आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा निम्म्यापेक्षा वयाचे आहेत. तरीही ते आले की मीही उठून उभा राहतो. कारण, तो सन्मान बाळासाहेब ठाकरेंना असतो. राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवा हे आदित्य ठाकरेंचं आव्हान हे पोकळ आहे. कारण, ते कुठला तरी इतिहास सांगत आहे. मी नारायण राणेंचा अलिकडचा इतिहास सांगतो. कोणीही त्यांच्या धमक्यांना घाबरत नाहीत. 20 ते 25 टक्के ही पक्षाची मतं असतील, ती राष्ट्रवादीचीही असतील. मग, शिवसेनेनं उभा केलेला प्रत्येक माणूस का निवडून आला नाही, असा सवालही दिपक केसरकर यांनी विचारला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर दररोज हजार लोकं असतात

एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर चला, हजार हजार लोकं असतात तिथे. वाढदिवसाएवढी गर्दी रोज असते. तुमच्याकडची 50 आमदार लोकं अशीच निघून जातात का, आमचा लढा स्वाभीमानासाठी असून शिवसेना वाचावी हाच आमचा हेतू होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरुद्ध आमचा लढा सरूच आहे, मग आमच्याविरुद्ध का बोलता, असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. आदित्य ठाकरेंना खऱ्या शिवसैनिकांची ओळखच कशी असेल, ते भेटेले असतील तर त्यांना खरा आणि खोटा शिवसैनिक माहिती असेल. उद्या राष्ट्रवादीचा एखादा माणूस आला तरी ते त्याला शिवसैनिकच म्हणणार, असे म्हणत नाशिकच्या गर्दीचा उल्लेखही केसरकर यांनी केला.

दरम्यान, माझ्या मनात कितीही आदर असू द्या, पण मी आमदारांचा प्रवक्ता म्हणून बोलतो. पण, तुम्ही सातत्याने आमच्या आमदारांविरुद्ध बोललात, तर कधी यांच्या भावना प्रक्षोभित होतील, हे सांगता येत नाही, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे. 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेदीपक केसरकर