Join us

आदित्य ठाकरे सेशन कोर्टात संजय राऊतांची भेट घेणार?, जामिन मिळणार का याकडे लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 13:27 IST

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राऊतांना सुनावण्यात आलेली ईडीची कोठडी आज संपत आहे.

मुंबई-

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राऊतांना सुनावण्यात आलेली ईडीची कोठडी आज संपत आहे. राऊतांना आज दुपारच्या सुमारास सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे स्वत: सेशन कोर्टात उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कोर्टाच्या सुनावणीआधी आदित्य ठाकरे हे संजय राऊत यांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

सेशन कोर्टात सुनावणीआधी आरोपीला कोर्ट परिसरात भेटता येतं. याच पार्श्वभूमीवर आजच्या सुनावणीला आदित्य ठाकरे कोर्टात उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत शिवसेनेकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

कोर्टानं संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी ८ ऑगस्टपर्यंत राऊत यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर ईडीनं याप्रकरणात अधिक चौकशी सुरू करत संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं. आता आजच्या सुनावणीत ईडीकडून कोर्टासमोर कोणते पुरावे सादर केले जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच संजय राऊत यांना जामीन मिळणार का? याकडे लक्ष असणार आहे. 

टॅग्स :संजय राऊतआदित्य ठाकरे