Join us  

महापोर्टल बंद करुन नवीन पोर्टल सुरु करा; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 5:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन चांगले पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई: राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहे. मात्र या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन चांगले पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी मुख्यमंत्र्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे 'महापोर्टल' रद्द करण्याची विनंती केली आहे. पोर्टलच्या अयोग्य कामकाजाच्या बर्‍याच तक्रारी आल्या असल्याने आम्ही नवीन पोर्टल सुरु करण्याची विनंती केली आहे. तसेच शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन आहे. काही राज्यांमध्ये त्यासाठी मंत्रालयात वेगळा विभाग आहे. त्यामुळे राज्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत मंत्रालयात स्वतंत्र विभाग स्थापन करावा, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महायुती सरकारने महापोर्टल सेवा सुरू केली होती. त्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे राज्यभरात ठिकठिकाणी महासेवा पोर्टलविरोधात आंदोलन देखील करण्यात आले होते. निवडणुकी आधी सुप्रिया सुळे यांनी संवाद यात्रा काढत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास महापोर्टल बंद करणार असल्याचे आश्वासन देखील दिले होते.

टॅग्स :सुप्रिया सुळेउद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसआदित्य ठाकरेशिवसेना