Join us  

मेट्रोची वाहतूककोंडी फोडण्यासाठी विशेष प्रयत्न - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 1:01 AM

टीम म्हणून काम करणे गरजेचे : पर्यावरणाचे नुकसान टाळणे गरजेचे

मुंबई : मेट्रोच्या कामांमुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. या वाहतूककोंडीच्या मुद्द्यावर जिथे मेट्रोची कामे सुरू आहेत तिथे बेस्ट प्रशासन आणि महापालिका यांची सांगड घालून वाहतूककोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री म्हणून गुरुवारी मुंबई उपनगर जिल्ह्याची बैठक घेतली. या वेळी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मी मुंबई उपनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रथमच मंत्री अनिल परब आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नगरविकास, मागासवर्गीयांचे कल्याण, कामगार कल्याण, ऊर्जा, उद्योग विकास, देशांतर्गत वाहतूक, पर्यटन, पायाभूत सुविधा, कचरामुक्त पदपथ, दर्जेदार रस्ते, प्रत्येक प्रभागासाठी विशिष्ट कलरकोड यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करून रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या. या वेळी विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी त्यांच्या सूचना आणि समस्या मांडल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. चांगले रस्ते, फुटपाथ, कचरामुक्तमुंबई, रेल्वे परिसर हे सर्व सुधारायचे आहे. उपनगरातील लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे टीम म्हणून काम करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे नुकसान न करता चांगली कामे करायची आहेत. त्यासाठी आम्ही समिती गठीत करणार आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :मेट्रोआदित्य ठाकरे