Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंनी घेतली सुरज चव्हाण यांची भेट; दोघांमध्ये जवळपास ३० मिनिटं झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 16:26 IST

सदर भेटीनंतर हा दबाव तंत्राचा भाग असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना केला. 

मुंबई: ईडीने बुधवारी मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे. ठाकरे गटाने गद्दार दिन साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने मुंबईत मोठे ऑपरेशन राबविले आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांवर एकापाठोपाठ एक छापे टाकण्यात आले. 

संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. पाटकर यांच्याशी संबंधित १० ठिकाणी छापे टाकण्यात आले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीयांवरही छापेमारी सुरु आहे. ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरही धाडी टाकण्यात आल्या आहेत. 

ईडीच्या या कारवाईवर आज माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सुरज चव्हाण यांची चेंबूरच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. जवळपास अर्धा तास आदित्य ठाकरे हे सुरज चव्हाण यांच्याशी चर्चा करत होते. त्यानंतर हा दबाव तंत्राचा भाग असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना केला. 

दरम्यान, ईडीच्या या कारवाईवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली जात आहे. अशाने शिवसैनिकांचा खच्चीकरण होणार नाही. घाणेरड्या वृत्तीने अशा प्रकारे कारवाई केली जात आहेत. राजकीय द्वेषापोटी गाडलेला मड उखडून काढण्याचा काम सरकारने सुरु केलेलं आहे. शिंदे गटाचे नेते यशवंत जाधव आणि आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची सुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी विनायक राऊतांनी केली आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेअंमलबजावणी संचालनालयशिवसेना