Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाशी युतीबद्दल विचारताच आदित्य म्हणाले, 'साफसफाई सुरू आहे!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 12:00 IST

आदित्य यांच्या या विधानाचा रोख भाजपासोबत उरलेसुरले नाते संपवण्याच्या दिशेने असल्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने 'एकला चलो रे' चा नारा देत भाजपाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यासंदर्भात मंगळवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांना शिवसेनेने घेतलेल्या 'एकला चलो रे' च्या भूमिकेविषयी विचारण्यात आले. तेव्हा आदित्य यांनी आम्ही 'साफसफाईला' सुरुवात केली असल्याचे सांगितले. आदित्य यांच्या या विधानाचा रोख भाजपासोबत उरलेसुरले नाते संपवण्याच्या दिशेने असल्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्रात सत्तेत आल्यापासून शिवसेनेला काडीची किंमत न देणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी स्वत: मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शहा उद्या भाजपाच्या संपर्क दौऱ्यासाठी मुंबईत येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सातच्या आसपास उद्धव ठाकरे आणि अमित शहा एकमेकांना भेटतील. या भेटीच्या माध्यमातून भाजपाने एकप्रकारे युतीच्या टाळीसाठी हात पुढे केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे अमित शहा यांना टाळी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाउद्धव ठाकरेअमित शहा