Join us

“लाडकी बहीण योजनेतील २१०० रुपयांसंदर्भात CM योग्य वेळी निर्णय घेतील”; कुणी दिली गॅरंटी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:37 IST

Ladki Bahin Yojana News: सरकारने सांगितल्याप्रमाणे महिलांना २१०० रुपये देणार आहात की नाहीत? असा सवाल ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत केला.

Ladki Bahin Yojana News: महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्या. मात्र, सरकार आल्यानंतर आता शिंदेंकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिंदेंनी मुख्यमंत्री असताना आणलेल्या योजना या सरकारने बंद केल्या, एकनाथ शिंदेंवर तुमचा एवढा राग का, असे चिमटे विरोधकांनी विधानसभेत काढले. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेतील हप्ता १५०० वरून २१०० केला जाईल, असे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र, अद्याप तो निधी वाढवला नसल्याने चर्चा सुरू झाली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्या योजनेत १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले, पण त्याला तुम्ही फाटा दिला, अशी टीका महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विधानसभेत केली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभा सभागृहात काही प्रश्न उपस्थित केले. यासंदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी विधानसभेत निवेदन केले.

वरुण सरदेसाईंनी नेमके कोणते प्रश्न उपस्थित केले?

वरुण सरदेसाई यांनी विचारले की, या योजनेसंदर्भात माझे तीन प्रश्न आहेत. पहिला, निवडणुकीपूर्वी योजना जाहीर केली तेव्हा किती लाभार्थी होते? दुसरा, निवडणुकीनंतर सगळे निकष लावले गेले, त्यामुळे नेमक्या किती लाभार्थी महिलांना अपात्र केले गेले? आणि तिसरा, सरकारने सांगितल्याप्रमाणे महिलांना २१०० रुपये देणार आहात की नाहीत? असे प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केले. याला महिला व बालकल्याण मंत्री आदिती यांनी सविस्तर उत्तर दिले.

२० ते २५ लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे आकडे अफवा

लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी केला तेव्हाच त्यात नमूद करण्यात आले होते की, १५०० हून अधिकचा आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेतून लाभार्थी महिलांना मिळत असेल, तर त्यांना लाडकी बहीण योजना लागू होणार नाही. नमो शेतकरी महिला योजनेत महिलांना १००० रुपयांचा लाभ मिळतो. शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला किमान १५०० रुपयांचा लाभ शासनाकडून मिळायला हवा. त्यानुसार नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थी महिलांना त्या योजनेतून १००० रुपये तर वरचे ५०० रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात. त्यामुळे त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले नाही. २० ते २५ लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे आकडे अफवा आहेत, असे तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

२१०० रुपयांसंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य वेळी निर्णय घेतील

पुढे बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ऑक्टोबर २०२४ मध्ये आचारसंहितेच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या २ कोटी ३३ लाख ६४ हजार लाभार्थी महिला होत्या. फेब्रुवारीत हप्ता दिला तेव्हा लाभार्थी महिलांचा आकडा २ कोटी ४७ लाखाहून जास्त आहे. याचा अर्थ असा की आता लाभार्थी महिलांचा आकडा वाढला आहे. महायुती सरकारने ही योजना आणली आहे. महिलांना १५०० रुपयांचा लाभ देणारे महायुतीचे एकमेव सरकार आहे. महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे. २१०० रुपयांसंदर्भात आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य वेळी निर्णय घेतील. पण लाडक्या बहि‍णींची फसवणूक होणार नाही, असे तटकरे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :लाडकी बहीण योजनाअदिती तटकरेराज्य सरकारमहायुतीविधानसभावरुण सरदेसाई