कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 06:19 IST2025-07-21T06:19:32+5:302025-07-21T06:19:57+5:30
पावसाळी अधिवेशनाचा व्हिडीओ रोहित पवारांनी केला व्हायरल, विरोधकांची कडाडून टीका; कृषिमंत्री म्हणाले, विधानसभेत काेणते कामकाज सुरू आहे ते बघत हाेताे, गेम खेळत नव्हताे!

कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
मुंबई : सरकारी कोट्यातून फ्लॅट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आणि वादग्रस्त विधानांप्रकरणी याआधी अनेकदा अडचणीत सापडलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा आता नव्या वादात सापडले आहेत. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहात कामकाज सुरू असताना कोकाटे यांचा मोबाइलवर रमी हा पत्त्यांचा ऑनलाइन गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असताना कृषिमंत्र्यांचा हा व्हिडीओ समोर आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो दिवसभर प्रचंड व्हायरल झाला.
किसानों की खेती पर भी आओ ना महाराज
राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असतानासुद्धा कृषिमंत्री रमी खेळतात. त्यांना ‘कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज’ ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवाल रोहित पवार यांनी व्हिडीओ पोस्ट करताना केला आहे.
कोकाटे म्हणतात, गेम स्किप करत होतो
गेम खेळत नव्हतो. मोबाइलमध्ये कोणीतरी गेम डाउनलाेड केला होता, तो स्किप करत होतो. विधानसभेचे कामकाज पाहिले. ते दिसले नाही म्हणून फोन ठेवून दिला, असे कोकाटे म्हणाले.
सुनील तटकरेंसमोर छावा संघटनेने उधळले पत्ते, लातुरात कार्यकर्त्यांनी केली मारहाण
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांची रविवारी सायंकाळी लातुरात शासकीय विश्रामगृह येथे पत्रपरिषद सुरू असताना छावाच्या कार्यकर्त्यांनी घाेषणाबाजी करत खा. तटकरे यांच्यासमाेर खेळण्याचे पत्ते उधळले. तुमच्या मंत्र्यांना विधानसभेत नव्हे तर घरी पत्ते खेळायला सांगा, असे म्हणत निषेधाच्या घाेषणा दिल्या. त्यानंतर अजित पवार गट आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चाेप दिला.
चुकीच्या गाेष्टींचं समर्थन नाही
कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असेल तर ते चूक आहे. मी याचे समर्थन करणार नाही. हा प्रकार निंदनीय आहे. याेग्य ती कारवाई करावी, असे खा. सुनिल तटकरे म्हणाले.