‘त्या’ पीडिताला ४० लाखांची अधिक भरपाई; अपघातामुळे अर्धांगवायू; उच्च न्यायालयाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 08:20 IST2025-07-15T08:20:16+5:302025-07-15T08:20:29+5:30
४ जुलै २०१६ रोजी अतुल वधाने दुचाकीवरून बोरिवलीला जात असताना दहिसरमधील प्रमिलानगर जंक्शन येथे एका शाळेच्या बसने वधाने यांच्या वाहनाला धडक दिली.

‘त्या’ पीडिताला ४० लाखांची अधिक भरपाई; अपघातामुळे अर्धांगवायू; उच्च न्यायालयाचा आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रस्ते अपघातामुळे अर्धांगवायू झालेल्या ३३ वर्षीय व्यक्तीला आजीवन वैद्यकीय सेवा आणि आधारासाठी ४०.३५ लाख रुपयांची अतिरिक्त नुकसानभरपाई देताना उच्च न्यायालयाने विमा कंपनीला चांगलेच धारेवर धरले. आता संबंधित व्यक्तीला एकूण १.५२ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला देण्यात आले आहेत.
४ जुलै २०१६ रोजी अतुल वधाने दुचाकीवरून बोरिवलीला जात असताना दहिसरमधील प्रमिलानगर जंक्शन येथे एका शाळेच्या बसने वधाने यांच्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे त्यांचा मणका फ्रॅक्चर झाला आणि पाठीचा कणा तुटला. या धडकेमुळे वधाने यांना अर्धांगवायू झाला. आता ते अंथरुणाला खिळलेले असून, सर्व कामांसाठी पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहेत. याप्रकरणी शाळा बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपपत्रही दाखल करण्यात आहे.
दरम्यान, वधाने यांनी नुकसानभरपाईसाठी मोटार वाहन अपघात लवादाकडे अर्जही केला. वधाने यांना अपघातामुळे आलेले कायमचे अपंगत्व आणि भविष्यात त्यांना लागणारे वैद्यकीय उपचार विचारात घेऊन लवादाने त्यांना १.११ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले. या निर्णयाला विमा कंपनी आणि वधाने या दोघांनीही उच्च न्यायालयात २०२२मध्ये आव्हान दिले.
स्वप्ने, आकांक्षा धुळीस
‘घटना घडली तेव्हा तो २५ वर्षांचा तरुण होता. त्याची स्वप्ने आणि आकांक्षा धुळीस मिळाली आहेत. तो अंथरुणाला खिळलेला आहे.
त्याचे त्याच्या जीवनावर आणि शरीरावर नियंत्रण नाही,’ असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने त्याला देण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेत ४०.३५ लाख रुपये वाढविले.