प्रचाराला ग्लॅमरचा तडका; रविना, गोविंदा, भाऊ कदम मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 07:55 IST2026-01-13T07:53:42+5:302026-01-13T07:55:00+5:30
उद्धवसेनेसाठी अभिनेत्री रविना टंडन तर महायुतीच्या प्रचारासाठी भाऊ कदम मैदानात उतरल्याचे चित्र आहे.

प्रचाराला ग्लॅमरचा तडका; रविना, गोविंदा, भाऊ कदम मैदानात
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून काहीसे दूर राहिलेले मनोरंजन विश्वातील कलाकार प्रचाराच्या शेवटच्या दिवसांमध्ये मैदानात उतरल्याने प्रचाराला ग्लॅमरचा तडका मिळाला आहे. उद्धवसेनेसाठी अभिनेत्री रविना टंडन तर महायुतीच्या प्रचारासाठी भाऊ कदम मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
वांद्रे पश्चिम येथे उद्धवसेनेकडून अक्षता मेनड्रोस उभ्या आहेत. रविवारी चिंबई ते कांतवाडी परिसरात काढलेल्या त्यांच्या प्रचार रॅलीत रवीना टंडनने लक्ष वेधले. रवीनाच्या गळ्यात शिवसेनेचा गमछा होता. तसेच अभिनेता आफताब शिवदासानीने घाटकोपरमध्ये रोड शो केला. उद्धवसेनेच्या सकीना शेख यांच्या प्रचाराची 'मशाल' आफताबने हाती धरल्याचे पाहायला मिळाले.
गोविंदाने कामाठीपुरा भागात निवडणूक रॅलीमध्ये खुल्या जीपमधून प्रचार करीत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मराठमोळी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी निवडणुकीच्या पत्रकांकडे दुर्लक्ष करण्याची ही वेळ नसून, काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याची वेळ असल्याचे म्हटले. तसेच मनसेच्या वैशाली राजू पाटणकर या आपल्या मैत्रिणीला निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकरने विक्रोळीतील महिला उमेदवाराचा सोशल मीडियावर प्रचार केला.
विनोदी अभिनेता भाऊ कदम यांनी महायुतीचे उमेदवार तेजिंदर सतनाम सिंग तिवानांच्या प्रचारासाठी रोड शोमध्ये सहभाग घेतला. मत हे फुकट देण्याची गोष्ट नाही, ती आपल्या भविष्यासाठीची गुंतवणूक असल्याचे मतदानाबाबत आवाहन करताना भाऊने सांगितले.
मी तुमचोच आसय, माकाच मत देवा...
मी तुमचोच आसय, माकाच मत देवा... ही केवळ प्रचारातील ओळ न राहता कोकणपट्ट्यातील मतदारांच्या मनाला थेट हात घालणारी साद बनली आहे. कोकणी पट्टयात विशेषतः कोकणचा माणूस, कोकणी भाषा आणि आपुलकीचा संवाद या त्रिसूत्रीवर उमेदवारांचा प्रचार रंगत आहे.
विक्रोळीत शिंदेसेनेच्या उमेदवार सुवर्णा कारंजे, राजेश सोनवळे यांच्या प्रचारात मंत्री योगेश कदम, आमदार नीलेश राणे यांनी 'आपला माणूस' ही ओळख ठसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
भांडुपमध्ये उद्धवसेनेच्या उमेदवार राजुल पाटील यांच्या प्रचारात आदेश बांदेकर, हास्यजत्रा फेम अरुण कदम यांनी प्रचारात उतरून कोकणच्या माणसाला भावनिक साद घातल्याचे चित्र आहे. अपक्ष उमेदवार अनीशा माजगावर या देखील कोकणी संवाद साधताना दिसल्या. राजकीय समीकरणे बदलत असली तरी प्रचाराचा केंद्रबिंदू मात्र कोकणची ओळख आणि भावनिक नाळ हीच ठरत आहे.
...तर राणे बंधू भांडुपमध्ये
भाजप उमेदवार स्मिता संजय परब यांच्यासाठी प्रभाग क्रमांक ११५मध्ये मंगळवारी नितेश राणेंची सभा होणार असून, दुसरीकडे शिंदेसेनेच्या उमेदवार सुप्रिया धुरत यांच्या प्रचार रॅलीत नीलेश राणे सहभागी होणार आहेत. एकाच वेळी दोन्ही भावांच्या तोफा या प्रभागात धडाडणार आहेत