फोटोला सोने लावा, तुमची भरभराट होईल! दुकानदाराला भामट्याने लावला लाखोंचा चुना

By गौरी टेंबकर | Updated: May 24, 2024 19:03 IST2024-05-24T19:03:01+5:302024-05-24T19:03:47+5:30

हा प्रकार बोरिवली पोलिसांच्या हद्दीत घडला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Add gold to the photo, you will flourish The shopkeeper was bribed by a liar | फोटोला सोने लावा, तुमची भरभराट होईल! दुकानदाराला भामट्याने लावला लाखोंचा चुना

फोटोला सोने लावा, तुमची भरभराट होईल! दुकानदाराला भामट्याने लावला लाखोंचा चुना

गौरी टेंबकर, मुंबई: देवीच्या फोटोला सोन्याचा स्पर्श करा, तुमच्या दुकानात भरभराट होईल असे सांगत एका दुकानदाराचे लाखो रुपयांचे सोने घेऊन एक भामटा पसार झाला. हा प्रकार बोरिवली पोलिसांच्या हद्दीत घडला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

बोरिवली पश्चिम परिसरात दुकानदार रंजन प्रधान (७१) यांचे घरीच फ्रेश मार्ट आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे २३ मे रोजी ते उघडले आणि त्यांचा मुलगा ओमकार हा जेवण्यासाठी घरातील वरच्या खोलीत गेला. दुपारी १ च्या सुमारास एक अनोळखी इसम त्या ठिकाणी आला आणि त्याने तुमचा मुलगा कुठे आहे अशी विचारणा प्रधान यांना केली. त्यावर तो बाजूलाच आहे असे उत्तर त्यांनी दिले आणि भामट्याने त्यांच्याकडे प्यायला पाणी मागितले. प्रधान यांनी त्याला पाणी दिले तेव्हा तुमचे दुकान खूप छान आणि मोठे आहे. त्याची भरभराट करायची असेल तर मी तुमची मदत करू शकतो असे बोलत त्याच्या बॅगमधून एका देवीचा फोटो त्याने बाहेर काढला. तसेच या फोटोला सोने लावल्यावर तुमच्या दुकानाची भरभराट होईल असे त्याने सांगितले. यावर विश्वास ठेवत प्रधान यांनी त्यांच्या हातातील १.५५ लाख रुपये किंमतीच्या दोन बांगड्या फोटोला लावण्यासाठी भामट्याला काढून दिल्या. त्या बांगड्या सदर इसमाने कागदामध्ये गुंडाळल्या आणि प्रधानना बोलण्यात गुंतवत त्या पळवून नेल्या. प्रधान यांचा मुलगा जेवून आल्यावर त्यांनी घडला प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर याची तक्रार त्यांनी बोरिवली पोलिसात दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Add gold to the photo, you will flourish The shopkeeper was bribed by a liar