अदानी ग्रूपने मुंबईतील कांदिवली आणि गुजरातच्या अहमदाबादमध्ये १ हजार बेड्सचं हॉस्पीटल तसंच मेडिकल कॉलेज उभारणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी तब्बल ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी ग्रूप करणार आहे आणि हे मेडिकल कॅम्पस 'अदानी हेल्थ सिटी' नावानं ओळखलं जाणार आहे.
हॉस्पीटलच्या उभारणीसाठी अदानी समुहाने अमेरिकास्थित मायो क्लिनिकसोबत करार केला आहे. मुंबईतील अदानी हेल्थ कॅम्पस हे उपनगरातील कांदिवली येथे असणार आहे. याचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील सर्वात मोठं खासगी रुग्णालय म्हणून ते ओळखलं जाईल. सध्याच्या घडीला अंधेरी पश्चिमेला असलेलं कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पीटल हे मुंबईतील सर्वात मोठं खासगी हॉस्पीटल आहे. ज्यात ७५० बेड्सची सुविधा उपलब्ध आहे. तर अंधेरी पूर्वेला असलेल्या सेव्हन हिल्स हॉस्पीटलची १५०० बेड्सची क्षमता आहे पण ते सध्या काही कायदेशीर वादामुळे ४०० बेड्सच्याच क्षमतेसह सुरू आहे.
अदानी ग्रूपने भारतात वेगवेगळ्या शहरांमध्ये असे आणखी कॅम्पस बांधण्याची योजना आखली आहे. ते परवडणाऱ्या दरात, जागतिक दर्जाचे वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय शिक्षण प्रदान करतील, असं अदानी ग्रूपनं एका निवेदनात म्हटलं आहे.
अदानी हेल्थ सिटीमध्ये १,००० बेड्सची मल्टी-सुपर-स्पेशालिटी हॉस्पीटल, वार्षिक १५० पदवीधर, ८० पेक्षा जास्त रहिवासी आणि ४० पेक्षा जास्त फेलो, स्टेप-डाउन आणि ट्रान्झिशनल केअर सुविधा आणि अत्याधुनिक संशोधन सुविधा असतील, असंही सांगण्यात आलं आहे.