Adani Group Chief Gautam Adani Meet CM Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच सागर बंगल्यावर नेते, पदाधिकारी यांची रिघ लागल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जण येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. यामध्ये केवळ महायुतीचे नाही, तर महाविकास आघाडीतील काही मंडळींनीही सागर बंगल्यावर हजेरी लावल्याचे सांगितले जात आहे. यातच आता दिग्गज उद्योजक गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी घेतली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ही सदिच्छा भेट असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी, याबद्दल तर्क वितर्क लढवले जात आहेत. तसेच राज्यातील उद्योगांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अदानींवरून संसदेत गदारोळ
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. गौतम अदानी यांच्या मुद्द्यावरुन संसदेत गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी 'मोदी अदानी भाई-भाई' असा मजकूर लिहलेली बॅग घेऊन आल्या होत्या. हिंडेनबर्ग प्रकरणात आधीच कायदेशीर बाबींना सामोरे जात असलेल्या गौतम अदानी यांना अमेरिकेच्या न्यायालयात अब्जावधी डॉलर्सची कथित लाच आणि फसवणुकीप्रकरणी आरोप करण्यात आले. गौतम अदानी यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले. हे सर्व आरोप अदानी समूहाकडून फेटाळण्यात आले. परंतु, या मुद्द्यावरून इंडिया आघाडीने विशेषतः काँग्रेसने केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली. राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील कथित साटेलोटे असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे नेतेही याच मुद्द्यावरून भाजपा महायुतीवर निशाणा साधत आहेत.
दरम्यान, काँग्रेसने केंद्र सरकार आणि अदानी समूहातील संबंधांसंदर्भातील आपल्या आरोपांचा पुनरुच्चार करत एक व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ संसदभवन परिसरात तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेस खासदार शिवाजी काळगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार मणिकम टागोर यांनी अदानी यांचा मुखवटा घातला. तर समोर उभे असलेले राहुल गांधी या दोघांना प्रश्न विचारत असल्याचे पाहायला मिळत आहे.