बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची एकमताने निवड
By संजय घावरे | Updated: April 2, 2024 15:31 IST2024-04-02T15:29:15+5:302024-04-02T15:31:29+5:30
नाट्यनिर्माते-दिग्दर्शक राजू तुलालवार बनले कार्याध्यक्ष

बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची एकमताने निवड
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बालरंगभूमी परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. चिल्ड्रन्स थिएटर अॅकॅडमीचे संचालक, नाट्यनिर्माते-दिग्दर्शक राजू तुलालवार यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून १७ जणांची बालरंगभूमी परिषदेची नवीन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली आहे. बीडमधील दीपा क्षीरसागर उपाध्यक्ष, तर नगरचे सतिश लोटके सचिव बनले आहेत.
अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच नीलम यांनी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यात दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये बाल रंगभूमीचे संमेलन घेऊन त्यात नाटयासह नृत्य, गायन, वादन या कार्यक्रमांसोबत मुलांना भावणाऱ्या सर्व रंगमंचीय कलाकृतींचा मोहत्सव भरवण्याची योजना आहे. बाल रंगभूमीवर कार्य करणाऱ्या रंगकर्मींचा सन्मान, लहान मुलांना प्रकाशयोजनेसारख्या विविध तांत्रिक बाबींची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षित करणे, पालकांची मानसिकता ओळखून ती बदलण्यासाठी शिबिरे घेणे, बालनाट्य संस्थांना अनुदान मिळवून देणे, बालनाट्य प्रयोगांना नाटयगृहांमध्ये सर्वजनिक सुट्टीच्या तारखा मिळवून देण्यासाठी आग्रह धरणे. चित्रकला, हस्तकला, शिल्पकला या कलांची गोडी मुलांना लागावी यासाठी कार्यशाळा आणि महोत्सव भरविण्याचे कामही भविष्यात बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे.