सेन्सॉर बोर्ड भ्रष्टाचार प्रकरणी अभिनेता विशालची चौकशी, सीबीआयने केली दोन तास चौकशी
By मनोज गडनीस | Updated: November 28, 2023 18:09 IST2023-11-28T18:08:17+5:302023-11-28T18:09:05+5:30
५ ऑक्टोबर रोजी सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल करत चार ठिकाणी छापेमारी केली होती.

सेन्सॉर बोर्ड भ्रष्टाचार प्रकरणी अभिनेता विशालची चौकशी, सीबीआयने केली दोन तास चौकशी
मुंबई - मार्क अँटोनी या तामिळ सिनेमाच्या हिंदी भाषेतील प्रसारणासाठी सेन्सॉर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित लाचखोरी प्रकरणी तामिळ अभिनेता विशाल याची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत दोन तास चौकशी केली. दुपारी तीन वाजता तो सीबीआयच्या कार्यालयात दाखल झाला होता व पाच वाजता तो तिथून बाहेर पडला. या प्रकरणी ५ ऑक्टोबर रोजी सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल करत चार ठिकाणी छापेमारी केली होती.
उपलब्ध माहितीनुसार, सिनेमाच्या प्रदर्शनासाठी आवश्यक सेन्सॉर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाच्या मुंबईत कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांनी अन्य लोकांसोबत संगनमत करत सात लाख रुपयांची लाचखोरी केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा हा दाखल केला होता. या लाचखोरीची माहिती स्वतः अभिनेता विशाल याने त्याच्या सोशल मीडियावरून दिली होती व या प्रकरणी पंतप्रधान नरेन्द्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती.