Join us  

दुर्गंधीचे साम्राज्य आणि ॲकॉस्टिक्सची बोंब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 7:26 AM

स्वच्छतागृहे स्वच्छ असली तरी आत शिरल्यावर जी दुर्गंधी येते ती खूप त्रासदायक ठरते. 

वैभव मांगले, अभिनेता, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): मुंबईतील तशी सगळीच थिएटर्स माझ्या आवडीची आहेत, पण ठाण्यातील गडकरी रंगायतन मला विशेष आवडते. कारण इथले सभागृह अतिशय सुंदर आहे. प्रेक्षक आणि कलाकार किंवा रंगमंच आणि समोर बसलेले रसिक यांच्यातील अंतर फार कमी आहे. त्यामुळे खूप छान ‘गिव्ह ॲण्ड टेक’ होते. गडकरीचा पडदा कलात्मक असल्याने मला खूप आवडतो, पण तो स्वच्छ ठेवला जात नाही. तो धुवायचा कसा हा मोठा प्रश्न असला तरी त्याची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. इतका सुंदर पडदा स्वच्छ ठेवला गेला नाही तर त्याचे सौंदर्य अबाधित कसे राहील? स्वच्छतागृहे स्वच्छ असली तरी आत शिरल्यावर जी दुर्गंधी येते ती खूप त्रासदायक ठरते. 

मेकअप रूममधल्या स्वच्छतागृहांमध्येही अतिशय घाणेरडा वास येतो. त्यामुळे नैसर्गिक विधीसाठी जाताना थोडी धाकधूक होते. हा मुद्दा आरोग्याशी निगडित असल्याने याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. गडकरीच्या रेस्टॅारंटमध्ये खूप चांगले खाद्यपदार्थ मिळतात. तिथल्या खाद्यपदार्थांवर यथेच्छ ताव मारल्यावर मग नाटक करायला वेगळीच मजा येते. स्टेजच्या मागच्या बाजूला बसायला सोफे आहेत. मराठी नाटकासाठी इथले वातावरण खूप छान आहे. 

गडकरीला प्रयोग करणे ही आम्हा कलाकारांसाठी फार आनंददायी गोष्ट असते. विंगेतील जागा मोठी असल्याने तिथे वावरणे सोपे जाते. अत्यंत कमी वेळात घाईघाईत कपडे बदलून रंगमंचावर एन्ट्री घेताना कोणतीही अडचण येत नाही. मेकअप रूम्स चांगल्या असून, तिथे वेळोवेळी साफसफाईही केली जाते. मुंबईतील जवळपास सर्वच नाट्यगृहांमधल्या मेकअप रूम्स आता चांगल्या मेंटेन केल्या जात आहेत. ॲकॉस्टिक्स चांगले नसल्याने निर्मात्यांना स्वत:ची साऊंड सिस्टीम आणावी लागते. याच कारणामुळे सर्व कलाकार लेपल वापरू लागले आहेत. कारण महाराष्ट्रातील ९० टक्के नाट्यगृहांचे ॲकॉस्टिक्स चांगले नसल्याने नाइलाजास्तव सगळ्या नट-नटींना लेपल वापरावा लागतो. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचतो. ‘वाडा चिरेबंदी’ नाटकासाठी आम्ही स्वत:ची साऊंड सिस्टीम घेऊन जातो. आज कुठल्याही नाट्यगृहाच्या ध्वनियंत्रणेला थेट माईक जोडून नाटक करणे शक्य नाही. 

जे कलावंत मेहनतीने बसवलेल्या नाटकातून आपल्याला वेगळी अनुभूती देतात, त्यांना नाट्यगृहात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नाट्यगृहाविषयीच्या विधायक सूचना त्यांनी केल्या आहेत. मान्यवर कलावंत आपल्यासमोर त्यांची भूमिका मांडत आहेत. गडकरी रंगायतन नाट्यसंकुलविषयी प्रख्यात अभिनेते वैभव मांगले आपल्या भेटीला आले आहेत. आपणही 8108899877 या नंबरवरच्या व्हॉट्सॲपवर आपली प्रतिक्रिया देऊ शकता.

पार्किंगची समस्या

ठाण्यातील मराठी नाट्य संस्कृती जतन करणारे हे नाट्यगृह आहे.  प्रेक्षकांच्या खुर्चीत बसून नाटक पाहतानाही कोणती समस्या जाणवत नाही. वातानुकूलित यंत्रणा व्यवस्थित आहे. कलाकारांच्या गाड्या पार्क करण्यासाठी पुरेशी जागा आहे. तिकीट खिडकीजवळही गाड्या पार्क करू दिल्या जातात. गर्दी झाल्यावर मात्र प्रेक्षकांना थोडा पार्किंगच्या समस्येचा सामना करावा लागत असेल.

प्रेक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया…

खुर्च्यांच्या दोन रांगांमध्ये थोडी जागा कमी असल्याने एक व्यक्ती बसलेली असताना तिथून पुढे जाताना अडचण भासते. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांमुळे इतरांचा रसभंग होतो.दोन्ही कोपऱ्यांमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना संपूर्ण रंगमंचावर दिसत नाही. कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांची रसिकांमध्ये वेगळी क्रेझ असल्याने खवैये प्रेक्षकांची चांदी होते.

 

टॅग्स :वैभव मांगलेनाटक