Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाच्या पाली हिल कार्यालयावर होणार कारवाई; पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 06:56 IST

सध्या कंगना हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरी असून मुंबईत ती खारमध्ये राहते.

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्रे येथील पाली हिल परिसरातील कार्यालयात अवैधरित्या काही बदल झाले आहेत. जानेवारीत कंगनाने या मालमत्तेचे नुतनीकरण करून तिथे कार्यालय स्थापन केले. मात्र, या जागेचा निवासी वापर बदलून व्यावसायिक केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. सोमवारी केलेली पाहणी आणि मंजूर आराखड्याच्या आधारे पालिकेचे पथक दोन दिवसांत अहवाल तयार करणार आहे. त्यानंतर लगेचच पुढील कारवाई निश्चित करण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या कंगना हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरी असून मुंबईत ती खारमध्ये राहते. तर वांद्रे येथील पाली हिलमध्ये तिचे मनिकर्णिका फिल्म या नावाचे कार्यालय आहे. पालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी तिच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. कंगनाने जानेवारीत या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. येथे सध्या रंगरंगोटी सुरू आहे.

अन्यथा कंगनाला व्हावे लागेल होम क्वारंटाइन

कंगना ९ सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे. ती विमानमार्गे मुंबईत आल्यास तिला नियमानुसार १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेला हा नियम आहे. महापालिका फक्त त्याची अंमलबजावणी करीत आहे. कंगना सात दिवसांपेक्षा कमी दिवस मुंबईत राहणार असेल तर होम क्वारंटाइनचा नियम तिला लागू होणार नाही, असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.

कंगना-राऊत दोघांचेही सूर नरमले

शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यातील शब्दिक युद्धाने सोमवारी काहीसा नरमाईचा व खुलासेवजा सूर आळवला. एकीकडे कंगनाने 'मला महाराष्ट्र आवडतो' असे टिष्ट्वट करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तर, आम्हाला शिवसेना प्रमुखांनी महिलांच्या सन्मानाची शिकवण दिल्याचे टिष्ट्वट राऊत यांनी केले. राऊत विरूद्ध रनौत वाद सध्या गाजत आहे.

राऊत यांनी कंगनाचा हरामखोर असा केलेला उल्लेख केल्याबद्दल समाज माध्यमातून ठपका ठेवला जात आहे. त्यामुळे राऊत यांनी आपली बाजू स्पष्ट केली. आम्हाला महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. मात्र काहीजण खोडसाळपणे शिवसेनेने महिलांचा अपमान केला अशी चुकीची माहिती पसरवत आहेत. हरामखोर या शब्दाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तर, कंगनाने महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर मला मोठे हिरो असलेले, बिग बॅनर चित्रपट आॅफर करण्यात आले, पण मी सर्वांना नाकारले. प्रचंड विरोध सहन केला, त्यानंतर मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी, कारण मला महाराष्ट्र आवडतो, असे टिष्ट्वट कंगनाने केले.

टॅग्स :कंगना राणौतमुंबई महानगरपालिका