अनधिकृत शटल सेवेवर कारवाई; उबर-सिटी फ्लोच्या बसेसवर आरटीओची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 07:37 IST2025-07-17T07:36:55+5:302025-07-17T07:37:09+5:30
आवश्यक परवानग्या न घेता सुरू असलेल्या ॲपवर आधारित बस, कार, बाइक टॅक्सी सेवांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

अनधिकृत शटल सेवेवर कारवाई; उबर-सिटी फ्लोच्या बसेसवर आरटीओची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) शटल सेवा पुरविणाऱ्या उबर आणि सिटी फ्लोच्या १२५ बसवर कारवाई करत १० लाखांपेक्षा अधिकचा दंड वसूल केला आहे.
आवश्यक परवानग्या न घेता सुरू असलेल्या ॲपवर आधारित बस, कार, बाइक टॅक्सी सेवांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानुसार ही कारवाई करण्यात आली. प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वे सेवा, सार्वजनिक बस सेवा अनेकांना गैरसोयीची वाटते. खासगी वाहनांसाठी पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यामुळे ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेकजण ॲप आधारित बससेवेचा वापर करत होते. सिटी फ्लो, उबर शटल, चलो व इतर ॲप आधारित बससेवा मुंबई महानगरात सुरू आहेत. परंतु ही वाहने कायदेशीर तत्त्वांचे पालन करत नसल्याचा ठपका ठेवला आहे.
मुंबईसारख्या शहरांमध्ये उबर आणि सिटी फ्लोच्या प्रत्येकी ३०० बस सुरू आहेत. शटल सेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक परवानग्या या संस्थांकडून घेण्यात आलेल्या नाहीत. या सेवा गेल्या २ ते ३ वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे परवानगी अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून, प्रत्येक बसमागे ५ ते १० हजारांचा दंड आकारण्यात आल्याचे अधिकारी म्हणाले.
शटल सेवेसाठी तरतूद होणार
राज्य सरकारने ॲप आधारित खासगी सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी (ॲग्रिगेटर) नवीन धोरण जाहीर केले आहे. सुरक्षित प्रवासासाठी या सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने नियम तयार करण्याचे काम सुरू आहे. नवीन धोरणामध्ये बस शटल सेवेसाठीही नियम आणि अटी-शर्तीचा समावेश असणार असल्याचे परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले.