मालाड मालवणीमधील १७ गोदामांवर हातोडा, शासकीय मालमत्तांवरील कारवाई सुरुच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:16 IST2026-02-27T13:14:05+5:302026-02-27T13:16:03+5:30
मालाड-मालवणीमधील मरीना एन्क्लेव्हच्या मागील बाजूस, पाठारेवाडी स्मशानभूमी परिसरात महसूल, पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहिमेद्वारे अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली.

मालाड मालवणीमधील १७ गोदामांवर हातोडा, शासकीय मालमत्तांवरील कारवाई सुरुच राहणार
मुंबई :
मालाड-मालवणीमधील मरीना एन्क्लेव्हच्या मागील बाजूस, पाठारेवाडी स्मशानभूमी परिसरात महसूल, पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहिमेद्वारे अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. सर्व्हे क्र. २१५, नवीन भूखंड क्र. ७४६ या शासकीय जमिनीवरील एकूण १७ अनधिकृत गोदामे हटवून २३,९३४ चौरस मीटर जमीन अतिक्रमणमुक्त केली.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि पश्चिम उपनगर अपर जिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, प्रभारी उपजिल्हाधिकारी विनायक पाडवी, तहसीलदार इरेश चप्पलवार, पी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी सहभाग घेतला.
शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांवर यापुढेही कारवाई
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही कारवाई पार पाडण्यात आली. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.