अग्निशमन यंत्रणेत दोष असणाऱ्या हॉटेल्सवर आठ दिवसांत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:41 AM2019-12-21T00:41:58+5:302019-12-21T00:42:31+5:30

स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश; लेखी अहवाल होणार सादर

action on hotels with defects in fire systems in Eight days | अग्निशमन यंत्रणेत दोष असणाऱ्या हॉटेल्सवर आठ दिवसांत कारवाई

अग्निशमन यंत्रणेत दोष असणाऱ्या हॉटेल्सवर आठ दिवसांत कारवाई

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिका, मुंबई अग्निशमन दलातर्फे कितीही वेळा कारवाई करण्यात आली, सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली, तरी काही उणिवा राहतातच. विशेषत: मुंबईकरांतर्फेही अग्निशमन सुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेतली जात नाही. परिणामी, आगीच्या घटना वाढतच जातात. अनेक वेळा तर यासंदर्भातील परवाने न घेता किंवा त्याचे नूतनीकरण न करताच आस्थापने सुरू ठेवली जातात आणि एखादा अपघात घडल्यास मुंबईकरांचे नाहक बळी जातात. या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल्स, उपाहारगृहातील अग्निशमन यंत्रणा, आरोग्य परवान्यांची तपासणी करून दोषींवर आठ दिवसांत कारवाई करा आणि याबाबतचा सविस्तर लेखी अहवाल स्थायी समितीच्या पटलावर ठेवा, असे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यासंदर्भातील आदेश प्रशासनाला दिले आहेत. मुंबईमधील आगींसह इतर दुर्घटनांचा अहवाल प्रशासनाने समितीला सादर केला असतानाच, समिती सदस्यांनी यात काही त्रुटी असल्याने नाराजी व्यक्त केली. विशेषत: कमला मिल दुर्घटनेनंतर हॉटेल्स, उपाहारगृहांवर वेगाने कारवाई झाली. नंतर वातावरण जैसे थे झाले. दरम्यानच्या काळात अग्निसुरक्षा आणि आरोग्य प्रमाणपत्र नसतानाही सुरू असलेली हॉटेल्स, बार, उपाहारगृहांची अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाने संयुक्त तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर कारवाई करावी. त्याचा अहवाल बैठकीत सादर करावा, असे आदेश यशवंत जाधव यांनी दिले आहेत.

संयुक्त तपासणी कक्षाची स्थापना
कमला मिल दुर्घटनेनंतर मनपाच्या विभाग कार्यालयातील संबंधित विभागाचे अधिकारी व मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी यांचा संयुक्त तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे कामकाज हे संबंधित विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्तांच्या अधिपत्याखाली होते.
च्या कक्षात मुंबई अग्निशमन दलाचा एक अधिकारी १ जानेवारी, २०१९ पर्यंत प्रत्येक विभाग कार्यालयात पाठविण्यात आला आहे. सदर अधिकारी तपासणीदरम्यान अग्निसुरक्षा व अग्निप्रतिबंध बाबींची तपासणी करून तसा अहवाल संबंधित सहायक आयुक्त यांना देतात.

६,२८२ आस्थापनांवर कारवाई
जानेवारीपासून आतापर्यंत १० हजार ८०० हॉटेल्स व वेगवेगळ्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, ६ हजार २८२ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान ९ हजार ९२१ अवैधरीत्या वापरण्यात येत असलेले गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

पूर्ततेनंतरच अग्निसुरक्षा प्रमाणपत्र
कमला मिल दुर्घटनेपूर्वी अग्निसुरक्षा व अग्निप्रतिबंधाबाबत देण्यात येणारे ना हरकत हे उपाययोजनांच्या अटीशर्ती पूर्ततेसापेक्ष देण्यात येत होते. सद्यस्थितीत अग्निसुरक्षा पूर्तता कक्षाद्वारे सर्व आस्थापनेस जेथे अग्निसुरक्षा शिफारस दिली जाते, त्या ठिकाणी मुंबई अग्निशमन दलातर्फे त्या शिफारशींची पूर्तता झाल्यानंतरच अग्निसुरक्षा प्रमाणपत्र देण्यात येते.

मुंबई अग्निशमन दल काय म्हणते?
जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत २ हजार ४८६ इमारत व आस्थापनांची तपासणी झाली असून, २०८ इमारती/आस्थापनांना अग्निसुरक्षिततेबाबतची पूर्तता न केल्याने नोटिसा बजावण्यात आल्या. नोटीसदरम्यान देण्यात आलेला कालावधी संपल्यानंतर कारवाई करण्यात आली नसल्याने, २०१५ पासून नोव्हेंबर, २०१९ पर्यंत ५९ प्रकरणांत न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: action on hotels with defects in fire systems in Eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.