Join us

रिक्त खाटांची नियमित डॅशबोर्डवर न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 21:59 IST

अशा रुग्‍णालयांना संबंधित नियमांनुसार नोटीस बजवण्‍याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.  

मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शहरात वाढत असताना मुंबई बाहेरील रुग्णही उपचारासाठी येत आहेत. यामुळे रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांचे नियोजन बिघडले आहे. त्यातच काही रुग्णालये त्यांच्याकडील रिकाम्या खाटांची माहिती वेळेत संगणकीय डॅशबोर्डवर अपडेट करीत नसल्याचे आढळून आले आहे. अशा रुग्‍णालयांना संबंधित नियमांनुसार नोटीस बजवण्‍याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.  

कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या जाणाऱ्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुक्तांनी एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू, सुरेश काकाणी यांच्यासह सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, रुग्णालयाचे अधिष्ठाता, विविध खात्यांचे अति वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालिकेने तयार केलेल्या डॅशबोर्डवर संबंधित रुग्‍णालयांनी आपापल्‍या रुग्‍णालयातील माहिती नियमितपणे ‘अपडेट’ करणे गरजेचे असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले. तसेच नियम मोडणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले. 

सील इमारतींमध्ये अधिक कठोर निर्बंध.... 

सील इमारतींची संख्या दहा हजारांहून अधिक झाली आहे. त्यामुळे अशा इमारतींमध्‍ये आता आणखी कडक निर्बंध लागू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यामध्‍ये प्रामुख्‍याने इमारतीत प्रवेश करणे व बाहेर जाणे, त्‍याचबरोबर इमारतीमध्‍ये कार्यरत असणारे सुरक्षारक्षक, लिफ्टमन, सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी यांची कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्‍याची सूचना त्यांनी केली.   

चाचण्या वाढविण्यासाठी नियोजन.... कोरोना चाचण्या वाढविण्‍यासाठी सर्व विभागस्‍तरीय सहाय्यक आयुक्‍तांनी आपापल्‍या विभागातील दैनंदिन चाचण्‍यांची संख्‍या नियोजनपूर्वक वाढविण्‍याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच एसटी महामंडळाच्या एक हजार बस गाड्या बेस्‍ट मार्गांवर चालविण्‍यासाठी भाडेतत्त्वावर घेण्‍यात येणार आहेत. 

मोहिमेवर देखरेख.... माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत करण्‍यात येत असलेले सर्वेक्षण योग्‍य प्रकारे होत असल्‍याची खातरजमा करणे, यासाठी परिमंडळीय उपायुक्‍तांच्‍या स्‍तरावरून काही व्‍यक्‍तींची नेमणूक करून त्‍यांच्‍याद्वारे नमुना पद्धतीने सर्वेक्षणाची चाचणी करण्‍याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस