सहकारी बँकांवर कारवाई अन् ‘राष्ट्रीयकृत’ना मात्र मदत- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 06:27 IST2018-09-16T00:14:08+5:302018-09-16T06:27:33+5:30
सहकारी बँकांबाबत सरकारचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे, असे पवार म्हणाले.

सहकारी बँकांवर कारवाई अन् ‘राष्ट्रीयकृत’ना मात्र मदत- शरद पवार
मुंबई : अडचणीत आलेल्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा सरकारकडून उचलला जातो पण त्याचवेळी अडचणीतील राष्ट्रीयकृत बँकांना मदत करण्याची भूमिका घेतली जाते, अशी खंत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. सहकारी बँकांबाबत सरकारचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
सारस्वत सहकारी बँकेच्या शताब्दी वर्ष समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. अडचणीतील राष्ट्रीयकृत बँकांना मदत केली पाहिजे याबाबत शंका नाही पण या बँकांना अलिकडील वर्षांत अडचणीच्या काळात तब्बल ८६ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आणि एखादी सहकारी बँक अडचणीत आली की त्या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची भूमिका घेतली जाते हा दुजाभाव योग्य नसल्याचे पवार म्हणाले.
राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लंगोटी घालून गेलेल्या माणसाला खूर्ची मिळत नाही. मात्र, कोट घालून आलेल्या माणसाला तो कसा आहे ते न पाहता त्याला त्याठिकाणी सन्मान मिळतो. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका डोळ्यावर फडकं बांधून काम करत आहेत की काय हे कळत नाही, असा चिमटाही पवार यांनी काढला. सारस्वत बँकेने टिकविलेल्या विश्वासार्हतेची त्यांनी प्रशंसा केली.
उद्धव ठाकरे यांनी सारस्वत बँकेच्या वाटचालीची प्रशंसा केली. सत्तेतील मित्र असलेल्या भाजपावर टीकेची संधी मात्र त्यांनी सोडली नाही. नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेची आज अशी स्थिती झाली आहे की सामान्य माणसाला कुठे जावे ते कळत नाही, असे ते म्हणाले. सारस्वत बँकचे संचालक गौतम ठाकूर, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, व्यवस्थापकीय संचालक स्मिता संधाने मंचावर उपस्थित होते.