परवानगी नाकारलेल्या मंडळांवर पालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 02:05 AM2018-09-12T02:05:51+5:302018-09-12T02:06:09+5:30
परवानगी नाकारण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या अर्जावर पुनर्विचार करण्यास महापालिका प्रशासन तयार नाही.
मुंबई : परवानगी नाकारण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या अर्जावर पुनर्विचार करण्यास महापालिका प्रशासन तयार नाही. याउलट मंडपावर कारवाई करण्यात येत असल्याने २८१ गणेशोत्सव मंडळे हवालदिल झाली आहेत. या कारवाईमुळे मुंबईत ऐन गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पालिका जबाबदार असेल, असा इशारा राजकीय पक्षांनी दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या नियमानुसार या वर्षी गणेशोत्सव मंडळांना मंडपाची आॅनलाईन परवानगी देण्यात येत आहे. मात्र २८१ गणेशोत्सव मंडळांचे अर्ज पालिकेने नाकारले. यामध्ये बहुतांशी मंडळे जुनी असल्याने त्यांना परवानगी मिळावी, अशी विनंती महापौर निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रशासनाला करण्यात आली होती.
मात्र ही मागणी फेटाळून प्रशासनाने मंडपावर कारवाई करण्यास सुुरुवात केली. या कारवाईचे तीव्र पडसाद स्थायीच्या बैठकीत आज उमटले. राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी हरकतीचा मुद्दा मांडून परवानगी नाकारलेल्या मंडळांना आॅफलाइन परवानगी देण्याची मागणी केली. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी किचकट प्रक्रियेमुळेच गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले.
>भाविकांमध्ये संतापाची लाट
अनेक ठिकाणी मंडपांवर थेट कारवाई केली जात आहे. अशा वेळी भक्तांच्या संतापाचा भडका उडाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील, असा इशारा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिला.
वाहतुकीला अडथळा ठरणारी मंडळे बाद
रस्ते वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा न करता बांधण्यात आलेल्या मंडपाला परवानगी देण्यात आली आहे. पालिकेकडे अर्ज केल्यानंतर अग्निशमन दल व वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस यांच्या मंजुरीनंतरच मंडपांची परवानगी दिली जाते.