Join us

जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, एक्स्प्रेससाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 14:02 IST

एक्स्प्रेसमधून प्रवास करताना ५ ते १२ वर्षांच्या व्यक्तीला तिच्या वजनाच्या अर्ध्या वजनाचे सामान नेण्यास मुभा देण्यात आली आहे.

मुंबई : एक्स्प्रेसने प्रवास करताना प्रवाशांना ठरावीक वजनाचे आणि आकाराचे सामान नेण्यासाठी मुभा देण्यात येते. यामध्ये आता १०० बाय १०० बाय ७० सेमीपेक्षा अधिक आकाराचे आणि ७५ किलोपेक्षा अधिक वजनाच्या सामानाला बंदी घालण्यात आली असून, हा नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांना यामध्ये १० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

एक्स्प्रेसमधून प्रवास करताना ५ ते १२ वर्षांच्या व्यक्तीला तिच्या वजनाच्या अर्ध्या वजनाचे सामान नेण्यास मुभा देण्यात आली आहे, तर इतर प्रवाशांना ट्रेनमधील वर्गवारीनुसार ७० ते १५० किलोपर्यंत सामान निःशुल्क नेण्यासाठी परवानगी असते. त्यापैकी ३५ ते ७० किलो सामान डब्यातून नेण्यास परवानगी असून, यामध्ये १० ते १५ किलोपर्यंत सूट देण्यात येते. निश्चित करून दिलेल्या सामानाच्या वजनापेक्षा व आकारापेक्षा जास्तीचे सामान असल्यास ते रेल्वेच्या कार्यालयामध्ये नोंदवणे अनिवार्य  असेल. हे सामान प्रवासी डब्याऐवजी लगेज डब्यातून न्यावे लागणार आहे. 

स्कूटर, सायकल लगेजसाठी, तसेच १०० बाय १०० बाय ७० सेमीपेक्षा मोठ्या आकाराच्या सामानावर वजनामध्ये देण्यात येणारी सूट ग्राह्य नसणार आहे. - विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे 

टॅग्स :रेल्वे