शक्ती नाही, तर सहनशक्ती म्हणजेच प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 09:13 IST2026-01-11T09:10:35+5:302026-01-11T09:13:01+5:30
आचार्य विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी पॉडकास्टमध्ये डॉ. विजय दर्डा यांच्याशी साधला मनमोकळेपणाने संवाद

शक्ती नाही, तर सहनशक्ती म्हणजेच प्रेम
मुंबई : 'शक्ती म्हणजे प्रेम नाही, सहनशक्ती म्हणजेच प्रेम आहे असे पद्मभूषण आचार्य विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी युद्धग्रस्त जगासाठी आवश्यक असलेल्या प्रेमाची व्याख्या स्पष्ट करताना सांगितले. शक्ती बदल करू शकते, पण दुरुस्ती करण्याची ताकद सहनशक्तीतच असते असेही ते म्हणाले. 'ऊर्जा महोत्सवाच्या' तिसऱ्या दिवशी लोकमत मीडिया समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी पॉडकास्टमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे उद्गार काढले. आधी आपल्याला स्वतःचे कुटुंब सावरणे गरजेचे आहे. नातेवाइकांप्रती प्रेम दाखवले पाहिजे. कोणत्याही सुधारणेची सुरुवात स्वतःपासूनच होते, असेही ते म्हणाले.
गुरुदेव श्री यांच्या ५००वे पुस्तक 'प्रेमाचे विश्व, विश्वाचे प्रेम'च्या प्रकाशनाच्या निमित्ताने मुलुंड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात डॉ. दर्डा यांनी आचार्यश्री यांच्याशी संवाद साधला. पॉडकास्टची सुरुवात विशेष अतिथी डॉ. विजय दर्डा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कल्पेश शाह, निखिल कुसुमगर, संजय शाह आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर जैन अलर्ट ग्रुप इंडिया व ऊर्जा समितीचे कल्पेश शाह, संजय शाह, कौशिकभाई, जीतूभाई, हेतलभाई, पलकभाई यांनी डॉ. दर्डा यांचा सत्कार केला.
अहिंसेचे निदान भगवान महावीरांच्या संदेशांतूनच
२६०० वर्षापूर्वी भगवान महावीरांनी दिलेले सत्य आणि अहिंसेचे संदेश आजही तितकेच प्रासंगिक व महत्वपूर्ण आहेत. डॉ. विजय दर्डा यांनी आचार्य विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी म. सा. यांच्यासमोर हा मुद्दा मांडला की, जर या संदेशांचा निष्ठेने देश-विदेशात प्रचार व प्रसार करण्यात आला असता, तर युद्धाच्या भीषणतेला सामोरे जाणारे आजचे जग अनेक पटींनी अधिक चांगले झाले असते. भारताबाहेर जैन धर्माचे तत्त्वज्ञान पोहोचवणारे वीरचंद राघवजी गांधी यांना विसरले गेले नसते, तर समाजाचे चित्र वेगळेच असते. भगवान महावीरांनीच परित्यक्त चंदनबालाला आत्मज्ञान देऊन उपकृत केले आणि ३६००० साध्वींच्या संघाची नायिका बनवून महिला सबलीकरणाची प्रेरणा दिली. त्यांनीच षट्काय जीवसृष्टी (जल, वायु, वनस्पती, अग्नि, पृथ्वी आणि प्राणी) यांच्या संरक्षणाचा संदेश देत पर्यावरण संवर्धनाची शिकवण दिली. आचार्य विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी म. सा. यांनी डॉ. दर्डा यांच्याशी सहमती दर्शवत सांगितले की, दीक्षेशी संबंधित काही मर्यादांमुळे जैन धर्म जागतिक स्तरावर व्यापक स्वरूप धारण करू शकला नाही.
'माझ्या वतीने करा हे तीन प्रयत्न'
डॉ. विजय दर्डा यांच्या माध्यमातून आचार्य विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी संपूर्ण जैन समाजाला ३ प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले. माझे प्रवचन आणि भगवानांच्या वचनांचे श्रवण करून दुर्जनांनी सज्जन बनावे. समाजातील सज्जनांनी संघटित व्हावे डाळिंबाच्या दाण्यांसारखे विस्कळीत न राहता, लाडूप्रमाणे घट्ट व एकत्रित राहावे. संघटित सज्जन व्यक्तींनी समाजकार्यांसाठी सक्रिय राहावे.
राजकारणापासून दूर राहणे घातक
जैन धर्माचा जगभर अपेक्षित प्रसार न होण्याबाबत गुरुदेवांनी जैन समाजालाच जबाबदार धरले. डॉ. दर्डा यांच्या प्रश्नावरील उत्तरात आचार्य म्हणाले की, आज आपण जगातील प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहोत, मात्र राजकारणात नगण्य आहोत. हे कटू सत्य आहे. कारण आपण राजकारणाला अस्पृश्य मानून त्यापासून दूर राहिलो. त्याचीच फळे आज भोगतो आहोत. पं. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना जैन समाजाचे ५३ खासदार होते, पण आज एकही नाही.
चारजण बदल घडवू शकतात
'सत्ता, शिक्षण, मीडिया आणि संत' हे चार घटक एकत्र आले, तर मोठ्यात मोठा बदल घडवू शकतात, असेही आचार्य विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी यावेळी म्हटले.
'आपण संपूर्ण जैन समाजाचे अनमोल रत्न आहात'
संवादाच्या सुरुवातीला डॉ. विजय दर्डा यांनी आचार्य विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांच्या नावाचा अर्थ सांगितला. ते म्हणाले "महाराज साहेब! आपण संपूर्ण जैन समाजाचे अमूल्य रत्न आहात. त्यामुळे आपल्या नावातील 'रत्न' हा शब्द सार्थ ठरतो." गुरुदेवांच्या ५००व्या पुस्तकाचे महत्त्व सांगताना दर्डा म्हणाले की, आज संपूर्ण जगातील लोक एकमेकांवर वर्चस्व मिळवू पाहत आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रेम आणि करुणेच्या तत्त्वज्ञानावर आधारित हे पुस्तक म्हणजे एक अद्वितीय साहित्य आहे. हे पुस्तक केवळ ग्रंथविश्वाचे नव्हे, तर संपूर्ण जैन समाजाचे सन्मानचिन्ह आहे. या पुस्तकाचे प्रकाशन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
नागपूर तुम्हाला साद घालत आहे
डॉ. दर्डा यांनी आचार्य विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी म. सा. यांना नागपूरला येण्याचे आमंत्रण देताना म्हटले, महाराज साहेब ! नागपूर इज कॉलिंग यू. पुन्हा एकदा नागपूरला येऊन आम्हा सर्वांना अनुग्रहित करा. यावर महाराजांनीही नागपूर चातुर्मासाच्या सुखद आठवणी सांगत, संघपतींशी चर्चा करण्यास सांगितले.
इतकी पुस्तके आपण कशी लिहिता?
आचार्य विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी म. सा. म्हणाले की, मी माझे गुरुदेव भुवनभानु सूरीश्वरजी म.सा. यांच्याकडे पोस्टकार्ड लिहिण्यास जात असे. त्यांनी माझ्यातील शक्यता ओळखून लेखनासाठी प्रेरित केले. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी लेखन सुरू केले. तो प्रवास ५०० पुस्तकांपर्यंत पोहोचला.
'लोकमत'ला दिले आशीर्वाद
शेवटी आचार्य विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. म्हणाले की, 'लोकमत' हा एकमेव असा समूह आहे ज्याने आपली सद्भावना टिकवून ठेवली आहे. हा मीडिया समूह मांसाहार, युवकांना भ्रमित करणाऱ्या आणि दुष्प्रचाराने भरलेल्या करोडो रुपयांच्या जाहिराती नाकारण्यात एक क्षणही वाया घालवत नाही. डॉ. दर्डा यांनी नागपूर चातुर्मास समितीचे अध्यक्ष म्हणून समाजाला एक सूत्रात बांधण्याचे अद्भुत कार्य केले आहे.
रीडरच बनतो नीडर
आचार्य विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. म्हणाले की, बदल घडवायचा असल्यास आपण नियमितपणे वर्तमानपत्र वाचा, पुस्तके वाचण्याची सवय लावा. कारण रिडरच लिडर बनतो आणि त्याचे निडर व्यक्तिमत्त्व घडते.
भारतरत्न देऊन सन्मान करा
डॉ. विजय दर्डा यांनी पद्मभूषण जैन आचार्य विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी म. सा. यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. ते म्हणाले की, जैन समाजात आपण असे व्यक्तिमत्त्व आहात की ज्यांना भारत सरकारने पद्मभूषणने सन्मानित केले आहे. साध्वी चंदनाजी यांना पद्मश्री मिळाले आहे.