सोन्याच्या खरेदीमुळे टास्क फ्रॉडमधील आरोपी जाळ्यात
By मनीषा म्हात्रे | Updated: March 3, 2024 18:16 IST2024-03-03T18:14:42+5:302024-03-03T18:16:33+5:30
टास्क फ्रॉडमधील आरोपीला फसवणुकीच्या रक्कमेतून सोने खरेदी करणे महागात पडले आहे.

सोन्याच्या खरेदीमुळे टास्क फ्रॉडमधील आरोपी जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टास्क फ्रॉडमधील आरोपीला फसवणुकीच्या रक्कमेतून सोने खरेदी करणे महागात पडले आहे. सोने खरेदीसाठी केलेल्या ऑनलाईन पेयमेन्टचा धागा पकडून बोरिवली पोलिसांनी मालाडमधून मोहम्मद इम्रान जमाल मोहम्मद (५०) याला अटक केली आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे.
बोरिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मनीष मधुसूदन राणे यांना व्हाट्सअपवर, जीबीएल डिजिटल मार्केटिंगची एचआर बोलत आहे असे भासवून नोकरीचे आमिष दाखवले. पुढे, वेगवेगळे ऑनलाईन प्रीपेड टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगून त्यातून मिळणारी रक्कम काढून घेण्यासाठी पैसे भरावे लागतील किंवा अन्य कारणे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये साडे सात लाख रुपये भरण्यास भाग पाडले. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी बोरिवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, बोरिवली पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तपास सुरु केला.
पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील, प्रमोद निंबाळकर आणि पोलीस अंमलदार शेख, गरजे, पाटील आणि नांगरे यांनी तपास सुरु केला. तपासात
फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी ५ लाख ९१ हजार रुपये आयसीआयसीआय बँकेत ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले. हाच धागा पकडून बँक खात्याची माहिती घेताच, आरोपींची मालवणीतील मार्वे रोड परिसरातून सोने खरेदी केल्याचे समोर आले. सराफाच्या दुकानातील सीसीटीव्ही मिळवत पोलीस
मोहम्मद इम्रान जमाल मोहम्मद नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहचले. त्याने दोन ठिकाणाहून सोने खरेदी केले.
पोलिसांनी संबंधित ज्वेलर्स मालकाचा जबाब नोंदवला. पुढे, सीडीआरद्वारे आरोपी मालाड परिसरात असल्याची माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीकडे पोलीस अधिक तपास करत आहे.