बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 07:13 IST2025-11-03T07:12:50+5:302025-11-03T07:13:48+5:30
मतदार यादीतील घोळ आणि बोगस मतदानाच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे

बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील घोळ आणि बोगस मतदानाच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शनिवारी काँग्रेस आ. अस्लम शेख आणि अमिन पटेल यांच्या मतदारसंघात पाच हजार बांगलादेशी घुसखोर असल्याचा दावा केला. त्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लोढा यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सावंत यांनी लोढा यांच्या वक्तव्यावर टीका केली. ‘काँग्रेस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली आणि भाजप सरकारने घुसखोरांना परत पाठवले’, असा दावा लोढा यांनी केला. मात्र, हा दावा खोटा असल्याचे सावंत म्हणाले.
युपीए सरकारच्या काळात (२००५ -२०१३) ८८ हजार ७९२ बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्यात आले, तर मोदी सरकारच्या काळात (२०१४-२०१९) फक्त दोन हजार ५५६ नागरिकांना परत पाठवले गेले, असे सावंत म्हणाले. सावंत यांनी महायुती सरकारच्या अकार्यक्षमतेवर टीका करत लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरून त्यांनी विचारले की, सरकार तुमचे आहे, मग घुसखोरांना परत पाठवण्यात अडथळा कोण घालतो? निवडणुकीआधी काँग्रेस आमदारांना टीमच्या बोगस ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता लक्ष्य करण्याऐवजी तुम्ही स्वतः अकार्यक्षम असल्याने तत्काळ राजीनामा द्या, अशी मागणी सावंत यांनी समाज माध्यमावर केली.