मुंबई - आर्थिक अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर घातलेल्या कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे ठेवीदारांना बँकेतून रक्कम काढण्यात अनेक अडचणी येत असून, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पीएमसी बँकेवर लादलेल्या निर्बंधांविरोधात काल ठेवीदारांनी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनानंतर घरी गेलेल्या एका ठेवीदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या ठेवीदाराचे पीएमसी बँकेतील खात्यामध्ये तब्बल 90 लाख रुपये अडकले होते. संजय गुलाटी असे या दुर्दैवी ठेवीदाराचे नाव आहे. ते वडील सी.एल. गुलाटी, आई वर्षा गुलाटी आणि पत्नी बिंदू गुलाटी यांच्यासह ओशिवरामधील तारापोरवाला गार्डनजवळ वास्तव्यास होते. संजय गुलाटी हे जेट एअरवेजमध्ये इंजिनियर होते. मात्र काही दिवसांपूर्वी जेट एअरवेज बंद पडल्याने ते आधीच आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांची पीएमसी बँकेत चार खाती होती. मात्र पीएमसी बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे बँकेत सुमारे 90 लाख रुपये अडकल्याने ते चिंतेत होते. दरम्यान, बँकेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांविरोधात ठेवीदारांकडून करण्यात आलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. आंदोलन आटोपून घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
आधी 'जेट'मधली नोकरी गेली, मग PMC मध्ये 90 लाख अडकले; ठेवीदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 10:58 IST