Join us  

अन्वय नाईकांना आत्महत्येसाठी अर्णब यांनी उकसवले नाही? क्लोजर रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 2:57 PM

इंडियन एक्सप्रेसच्या वर्तमानपत्राच्या अनुसार सुरेश वरडे यांच्याद्वारे तपास करण्यात आलेल्या अहवालानुसार, याप्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यासह अटक करण्यात आलेल्या इतर दोघांकडून अन्वय नाईक यांना पैसे येणे होते.

ठळक मुद्देइंडियन एक्सप्रेसच्या वर्तमानपत्राच्या अनुसार सुरेश वरडे यांच्याद्वारे तपास करण्यात आलेल्या अहवालानुसार, याप्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यासह अटक करण्यात आलेल्या इतर दोघांकडून अन्वय नाईक यांना पैसे येणे होते.

मुंबई - अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अंतरीम जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिल्यामुळे अर्णब गोस्वामींना अद्यापही कारगृहातच मुक्काम करावा लागत आहे. याप्रकरणी 2019 सालची एक क्लोजर रिपोर्ट समोर आली आहे. त्यावरुन, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या वर्तमानपत्राच्या अनुसार सुरेश वरडे यांच्याद्वारे तपास करण्यात आलेल्या अहवालानुसार, याप्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यासह अटक करण्यात आलेल्या इतर दोघांकडून अन्वय नाईक यांना पैसे येणे होते. तसेच, अहवालात असेही म्हटले आहे की, अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचं कुठेही आढळून येत नाही. विशेष म्हणजे अन्वय नाईक हे गेल्या 6 ते 7 वर्षांपासून आर्थिक संकटात होते. त्यामुळेच, अन्वय यांनी सुरुवातील आपल्या आईचा गळा आवळून खून केला. त्यानंतर, स्वत: आत्महत्या केली. यासंदर्भात झी न्यूज हिंदीने इंडियन एक्सप्रेसच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. 

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात दाखल करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी सत्र न्यायालयात 25 पानांचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार, शेख आणि सारडा यांच्यावर अन्वय नाईक यांचे देणे बाकी होते. मात्र, ही सर्व बाकी कॉनकॉर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अर्धवट काम सोडल्यामुळे किंवा कामाचा दर्जा उचित नसल्याने देण्यात न आल्याचं सांगण्यात आलं आहे.

नाईक कुटुंबीयांचा अधिकाऱ्यांवर आरोप

नाईक कुटुंबीयांनी पोलीस अधिकारी सुरेश वरडे यांच्यावर आरोप लावले आहेत. वरडे यांनी हा खटला अविश्वासार्ह बनविण्यासाठी आणि तक्रार वापस घेण्यासाठी एका अर्जावर सही करण्यासाठी धमकावल्याचं नाईक कुटुंबीयांना म्हटलं आहे. त्यामुळे, जानेवारी महिन्यातच हा खटला बंद करण्यात आला. आता, याप्रकरणी वरडेंना चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यावरुन, पीडित कुटुबींयांचा दावा खरा की खोटा, याचा उलगडा होईल. 

अर्णब गोस्वामींनी दिला जबाब

नाईक आत्महत्याप्रकरणी आरोपी शेख आणि सारडा यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात आपला जबाब दिला होता. तर, अर्णब गोस्वामींनी मुंबईतील पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला. क्लोजर रिपोर्टनुसार, अर्णब गोस्वामी यांनी आपल्या जबाबात इंटेरियर डिझाईनरकडून समाधानकारक काम झालं नसल्याचं म्हटलं आहे. नियमित कालवधीत काम पूर्ण झाले नाही, तसेच कामाचा दर्जाही खालवला होता, न्यूजरुमध्ये पानी गळत होते. तसेच, मी देण्या-घेण्याच्या व्यवहारात बारकाईने पाहत नव्हतो. 21 ऑक्टोबर 2017 रोजी आम्ही पैसे दिले होते. त्यावेळी 85 ते 90 टक्के रक्कम आम्ही दिली होती. बाकीचे पैसे काम पाहिल्यानंतर देण्यात येणार होते, असे अर्णब यांनी जबाबात म्हटले आहे.

टॅग्स :अर्णब गोस्वामीगुन्हेगारीरायगडपोलिस