मध्य रेल्वेवरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 05:14 IST2020-01-03T05:14:22+5:302020-01-03T05:14:34+5:30
२०१८ च्या तुलनेत २०१९ मधील दुर्घटना ११.८२ टक्क्यांनी कमी

मध्य रेल्वेवरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटले
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरच्या मुंबई विभागात अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या २०१८ सालच्या तुलनेत २०१९ मध्ये ११.८२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावर जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ मध्ये वेगवेगळ्या अपघातांत १ हजार २५१ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ मध्ये अपघातांत १ हजार ४१४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
मध्य रेल्वेद्वारे सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे लोकल अपघातांत मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे अपघात कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम मागील वर्षभरात राबविण्यात आले.
रेल्वे रुळांच्या शेजारी संरक्षक भिंत उभारण्यावर भर देण्यात आला. सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते मानखुर्द यादरम्यान संरक्षक भिंत बांधली आहे. १३० किमीपैकी ११३.१५ किमी रेल्वे रुळांवर दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. मागील वर्षात १७.२५ किमी संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले असून २७.५ किमीचे काम सुरू आहे. यासह अतिरिक्त २६.५ किमी लांबीची संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव आहे.
मध्य रेल्वे मार्गावर मागील पाच वर्षांत ७९ पादचारी पूल उभारले. २४ पादचारी पुलांचे बांधकाम सुरू आहे. विविध रेल्वे स्थानकांवर
७६ सरकते जिने आणि ४० लिफ्ट बसविण्यात आल्या. आणखी १०१ सरकते जिने आणि ६५ लिफ्टचा प्रस्ताव आहे. मागील तीन वर्षांत तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकलच्या ११४ फेºया वाढविण्यात आल्या.