Join us

वर्सोवा-भाईंदर कोस्टलसाठी भूसंपादनाला गती द्या : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:09 IST

आंतर मार्गिकांचे आराखडे, रस्त्यांची जोडणी, वाहनांच्या गतीवर चर्चा 

मुंबई :मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेने कोस्टल रोडचा (उत्तर) वर्सोवा ते भाईंदर प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन लवकर करावे. शिवाय प्रकल्प मार्ग रेषेखालील शासकीय जमीन ही हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी, अशा सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. या प्रकल्पाला नुकतीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर बांगर यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्तांच्या पाहणीदरम्यान चारकोप, गोराई, कांदरपाडा, दहिसर आंतर मार्गिका यांचे आराखडे, वाहनांची प्रस्तावित गती, अस्तित्वातील रस्त्यांची जोडणी यांबाबत सविस्तर चर्चा व पडताळणी करण्यात आली. त्याचबरोबर मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील मार्गरेषा, भूसंपादन, मिठागर जमिनींची उपलब्धता याचाही आढावा घेण्यात आला. देवीदास मार्गावर नॉन सीआरझेडमध्ये कामे सुरू करा या प्रकल्पात पॅकेज ‘ई’अंतर्गत चारकोप खाडी ते गोराई आंतरमार्गिका, तसेच पॅकेज ‘एफ’अंतर्गत गोराई आंतरमार्गिका ते दहिसर आंतरमार्गिका  प्रस्तावित आहे. यासाठी गोराई कचराभूमीच्या बाजूने कार्यस्थळाकडे जाणारे तात्पुरते पोहोच रस्ते विकसित करणे आवश्यक आहे. बोरिवली येथील देवीदास मार्गाकडून कार्यस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी भूसंपादन करण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या.  पॅकेज ‘एफ’अंतर्गत बोरिवली येथील देवीदास मार्गावर ८०० मीटर लांबीच्या नॉन सीआरझेड भागामध्ये प्रत्यक्षात कामे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कास्टिंग यार्डच्या जमिनीबाबत सूचनाकास्टिंग यार्डसाठी जमिनीची उपलब्धता, बांधकाम, कार्यस्थळाकडे जाणारे पोहोच रस्ते यांची पाहणी करण्यात आली. पॅकेज सी आणि डी अंतर्गत माईंडस्पेस मालाड ते चारकोप खाडीदरम्यान उत्तर दिशा आणि दक्षिण दिशेने जाणारे बोगदे बांधण्यात येणार आहेत. प्रकल्पापर्यंतचे पोहोच रस्ते, बोगदा खोदण्यासाठी संयंत्र, कट अँड कव्हर भागांची जुळवणी याच ठिकाणी हाेणार असल्याचे बांगर यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई कोस्टल रोडमुंबई