मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच एसी लोकल, १४ फेऱ्या वाढणार; प्रवास होणार गारेगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 09:29 IST2025-10-21T09:28:51+5:302025-10-21T09:29:05+5:30
सध्या मध्य रेल्वेकडे सात एसी लोकल आहेत, त्यापैकी सहा लोकलच्या माध्यमातून दिवसाला ८० फेऱ्या चालवण्यात येतात.

मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच एसी लोकल, १४ फेऱ्या वाढणार; प्रवास होणार गारेगार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक नवीन एसी लोकल लवकरच दाखल होणार असून, या लोकलच्या १४ फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. नवीन एसी रेक या आठवड्याच्या अखेरीस आयसीएफ चेन्नईहून मुंबईसाठी रवाना होईल. त्याची टेस्टिंग करून काही आठवड्यांमध्ये तो वापरात काढला जाऊ शकतो, असे अधिकारी म्हणाले.
सध्या मध्य रेल्वेकडे सात एसी लोकल आहेत, त्यापैकी सहा लोकलच्या माध्यमातून दिवसाला ८० फेऱ्या चालवण्यात येतात. एक देखभालीसाठी राखीव ठेवला जातो. नवीन एसी लोकलमुळे मध्य रेल्वेकडे एकूण आठ एसी लोकल होणार असून, तो वापरात आणल्याने एसी लोकलच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एका एसी लोकलच्या माध्यमातून १४ फेऱ्या चालवल्या जातात. त्यामुळे मध्य रेल्वेवर ८०वरून ९४पर्यंत एसी लोकलच्या फेऱ्या वाढू शकतात. दरम्यान, या सेवा वाढवल्या तरी एकूण फेऱ्यांमध्ये वाढ होणार नसून त्या १,८१० राहणार आहेत. त्यामुळे नॉन एसीच्या फेऱ्या कमी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.