Join us  

सावधान! सोशल मीडियावर महिलांशी असभ्य वर्तन महागात पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 11:50 AM

अवघ्या तासाभरात आरोपीला अटक होणार

मुंबई : सोशल मीडियावर महिलांविरोधात आक्षेपार्ह विधान आणि टीका करणाऱ्या व्यक्तींविरोधात आता तात्काळ कारवाई केली जाणार आहे. यासाठी महिला आयोगानं सायबर सेलची स्थापना केली आहे. यामुळे अवघ्या एका तासाभरात आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करणं शक्य होणार आहे. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अनेकदा महिलांना ट्रोल केलं जातं. त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि अश्लिल विधानं केली जातात. मात्र बहुतांश महिलांना याबद्दलची तक्रार करता येत नाही. मात्र आता राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात सायबर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे महिलांविरोधात अश्लिल विधानं करणाऱ्या, आक्षेपार्ह टीका करणाऱ्या प्रकारांमध्ये घट होईल, अशी आशा महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केली. 'आम्ही फक्त सायबर सेलची स्थापना करुन थांबणार नाही. या प्रकरणातील आरोपींवर जलद कारवाई व्हावी, यासाठीही आम्ही विशेष प्रयत्न करू. महिलांना ट्रोल करणाऱ्यांवर एका तासाच्या आत कारवाई करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचललं जात आहेत. यामध्ये अमेरिकेच्या धर्तीवर कारवाई करण्यात येईल,' असं रहाटकर यांनी सांगितलं. अमेरिकेतील सायबर क्राईम करणाऱ्या व्यक्तीला सर्व्हरच्या मदतीनं अवघ्या एका तासात शोधून काढून त्याच्याविरोधात कारवाई केली जाते. याच धर्तीवर आता राज्य महिला आयोगाचा सायबर सेल विभाग काम करेल.  

टॅग्स :सोशल मीडियामहिलागुन्हा