मुंबई - राज्यातील नौकानयन क्षेत्रातील मनुष्यबळास योग्य प्रशिक्षण, कौशल्य वृद्धीसंदर्भात सहाय्य करण्यासाठी बंदरे विकास मंत्री श्री. अस्लम शेख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) आणि चेन्नईमधील भारतीय सागरी (मेरिटाइम) विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करण्यात आला. महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी आणि भारतीय सागरी विद्यापीठाच्या संचालक कमोडोअर राजीव बन्सल यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या. या करारामुळे राज्यातील इनलँड वेसल्सवर तैनात होणाऱ्या सुमारे 7 हजार तरुणांना नौकानयन विषयक कौशल्य व प्रशिक्षण मिळणार आहे.
यावेळी परिवहन व बंदरे विकास विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन संजय शर्मा, श्री बढिये आदी उपस्थित होते. राज्यातील नौकानयन क्षेत्राच्या वाढीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून देशातील पहिल्या सागरी विद्यापीठासोबत मंडळाने सामंजस्य करार केला आहे. सागरी विद्यापीठासोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र सागरी मंडळ ही पहिलीच संस्था आहे. या करारानुसार, राज्यातील नौकानयन क्षेत्रातील मनुष्यबळास योग्य असे तांत्रिक व इतर प्रशिक्षण देणे, त्यांच्यातील कौशल्य वाढविणे यासाठी भारतीय सागरी विद्यापीठ महाराष्ट्र सागरी मंडळाला सहकार्य करणार आहे. तसेच राज्याच्या किनारपट्टी भागातील सागरी उपक्रमांना चालना देण्यासाठी व सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक असणारे संशोधन, अभ्यासक्रम व प्रशिक्षण यांचा आराखडा तयार करण्यासाठीही विद्यापीठ सहकार्य करणार आहे.
विद्यापीठाच्या संशोधनाचा राज्यातील सागरी क्षेत्राच्या विकासासाठी लाभ – अस्लम शेख
मंत्री शेख म्हणाले, महाराष्ट्र सागरी मंडळाने (मेरीटाईम बोर्ड) देशात प्रथमच भारतीय सागरी विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार केला आहे, ही अभिमानस्पद गोष्ट आहे. या करारामुळे नौकानयन क्षेत्रात कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणार आहे. यामुळे राज्यातील सागरी उपक्रमांना चालना मिळणार असून सुमारे सहा ते सात हजार तरुणांना याचा लाभ होणार आहे. तसेच विद्यापीठाच्या संशोधनाचा व ज्ञानाचा उपयोग राज्यातील सागरी नौकानयन क्षेत्राच्या विकासासाठी होणार आहे.
मेरिटाईम इंडिया समिटमध्ये महाराष्ट्राचा सहभाग
केंद्र शासनाच्या नौकानयन मंत्रालयातर्फे आयोजित व्हर्च्युअल मेरिटाईम इंडिया समिट 2021 मध्ये महाराष्ट्राचे पॅव्हिलियन असणार आहे. या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम, राज्यातील सागरी वाहतुकीसंबधीच्या पायाभूत सुविधा आदी माहिती उपलब्ध होणार आहे. मेरिटाईम इंडिया समिटमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले आहे.
या समिटमध्ये उद्या 2 मार्च रोजी ‘महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी’ या विषयावर विशेष चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रामध्ये राज्यातील बंदरे विकास विभागाचे अधिकारी तसेच उद्योग, एमआयडीसीचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: About 7,000 youth in the state will get training in sailing, aslam shaikh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.