Join us

रद्द तिकिटाचा परतावा पडला ६४ हजार रुपयांना; सायबर भामट्याविरोधात पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 16:21 IST

५७ वर्षीय महिलेला सायबर भामट्याने हजारोंचा गंडा घातला असून याविरोधात त्यांनी खार पोलिसात तक्रार दिली आहे.

मुंबई : चित्रपटाचा रद्द तिकिटाचा परतावा मिळवण्यासाठी गुगलवर सापडलेल्या ‘बुक माय शो’ ॲपचा नंबर डायल करणे एका ५७ वर्षीय महिला डॉक्टरला महागात पडले. यात सायबर भामट्याने त्यांना हजारोंचा गंडा घातला असून याविरोधात त्यांनी खार पोलिसात तक्रार दिली आहे.

तक्रारदार डॉक्टर यांचे खारच्या एस.बी. पटेल रोडवर क्लिनिक आहे. त्यांनी खार पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जानेवारी रोजी दुपारी पीव्हीआर थिएटर जुहू याठिकाणी चित्रपट पाहायला जाण्यासाठी बुक माय शो ॲपवर तिकीट बुक केले. त्यांनी तिकिटाची रक्कम ८४१ रुपये भरली, मात्र तिकीट मिळाले नाही. गुगलवर बुक माय शो ॲपचा कस्टमर केअर नंबर मिळवत त्यावर फोन केला. फोन उचलणाऱ्या व्यक्तीला पैसे देऊनही तिकीट मिळाले नसल्याचे सांगितले. पैसे परत मिळवण्यासाठी तुम्ही अव्वल डेस्कही ॲप डाऊनलोड करत मला गुगल पे वरून एक रुपया पाठवा, असे त्याने सांगितले.

...आणि खात्यातून हजारो रुपये डेबिट झाले 

  कॉलरने त्यांना ‘तुम्ही फक्त तुमचा पिन क्रमांक टाका; परंतु, ओके करू नका, असे सांगितले. त्यानंतर त्यांच्या मोबाइलचे शेवटचे पाच क्रमांक पे द अमाउंट या ठिकाणी टाइप करायला लावले. त्यानुसार डॉक्टरने त्यांच्या मोबाइल क्रमांकाचे शेवटचे पाच आकडे ६३७५२ टाइप केले.

  तितक्यात त्यांच्या बँक खात्यातून ६३ हजार ७५२ रुपये डेबिट झाले. पैसे गेल्याचा मेसेज डॉक्टरला आल्यावर आपली फसवणूक झाल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात खार पोलिसात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई पोलीस