Join us  

१५ लाख उकळले, अन् नोकरीही दिली नाही; मरिन ड्राइव्ह पोलिसांत गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 11:02 AM

याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई : मंत्रालयीन कर्मचारी असल्याचे सांगून तरुणीला परिवहन विभागात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून १५ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

नाशिक येथील रहिवासी असलेले ६२ वर्षीय भूपेंद्र परदेशी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी हर्षवर्धन ऊर्फ ओंकार पडघल मोल पाटील व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये एकूण १५ लाखांची फसवणूक झाली आहे. 

 तक्रारीनुसार, १० ते २२ मार्च २०२१ दरम्यान आरोपींनी मंत्रालयात नोकरी करत असल्याचे सांगून जाळ्यात ओढले. मुलीला परिवहन खात्यात नियुक्ती करून देत असल्याचे सांगून १५ लाख उकळले. मात्र, बरेच दिवस उलटूनही नोकरी न लागल्याने त्यांना संशय आला. पैसे परत देण्याबाबत त्यांनी तगादा लावला. मात्र पैसे दिले नाहीत. अखेर, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

रेल्वेतील नोकरीसाठी मोजले सहा लाख-

भायखळा येथील फारुख अहमद दादन (५९) यांना रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांना गंडविले आहे. ऑगस्ट २०२२ ते १९ एप्रिलदरम्यान ही फसवणूक करण्यात आली आहे. आरोपींनी फारुख यांना त्यांचे नातेवाईक रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डमध्ये नोकरीला असल्याचे सांगून रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या मुलाचे खोटे व बनावट अपॉइंटमेंट लेटर पाठवून विश्वास संपादन करून फसवणूक केली. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी अनंत भागोजी बल्लाळ, श्रीलता बल्लाळ या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :मुंबईधोकेबाजीगुन्हेगारीपोलिस