विमानतळावर पकडले दीड कोटींचे परकीय चलन; डीआरआयने दोघांना केली अटक
By मनोज गडनीस | Updated: May 1, 2024 17:09 IST2024-05-01T17:08:39+5:302024-05-01T17:09:39+5:30
सिंगापूरला जाणाऱ्या दोन प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन असल्याची विशिष्ट डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

विमानतळावर पकडले दीड कोटींचे परकीय चलन; डीआरआयने दोघांना केली अटक
मनोज गडनीस, मुंबई : मुंबईविमानतळावरून सिंगापूर येथे दीड कोटी रुपयांचे परकीय चलन घेऊन जाणाऱ्या दोन प्रवाशांना केंद्रीय महसूल गुप्तचर संघटनेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हे दोघेही चेन्नईचे रहिवासी आहेत. अब्दुल वहाब नैना आणि मोहम्मद थंबी साहूल अशी या दोघांची नावे आहेत.
सिंगापूरला जाणाऱ्या दोन प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन असल्याची विशिष्ट डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. मध्यरात्रीनंतर सिंगापूरला जाणाऱ्या विमानाच्या जवळ अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे दीड कोटी रुपयांचे परकीय चलन आढळून आले. यापैकी एकाच्या बॅगेत ७७ लाख ५० हजार रुपये मूल्याचे तर दुसऱ्याच्या बॅगेत ६९ लाख ९० हजार रुपये मूल्याचे परकीय चलन आढळून आले. हे पैसे चेन्नईत एका व्यक्तीने आपल्याला दिले होते व ते सिंगापूरला एका माणसाला देण्यास सांगितल्याची कबुली या दोघांनी अधिकाऱ्यांना दिली.