Join us

अग्निशमन दलाकडून बचावकार्य होणार सक्षम; ‘सिम्युलेटर टॉवर’मधून प्रात्यक्षिकांतून प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 14:10 IST

मुंबई महानगरातील एकाही अग्निशमन दलाकडे सिम्युलेटर टॉवर नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज येथे अग्निशमन दलाचे पहिले सिम्युलेटर टॉवर प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. या माध्यमातून अग्निशमन दलाच्या जवानांना आता प्रात्यक्षिकांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी पालिकेने कार्यादेश दिले असून, सिम्युलेटर टॉवरचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी पालिका ४१ कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबई महानगरातील एकाही अग्निशमन दलाकडे सिम्युलेटर टॉवर नाही.

मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांकडून कवायती करून घेतल्या जातात. शिडीवर चढणे-उतरणे, उंचावरून उडी मारणे आदी प्रशिक्षण त्यांना दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात आग विझविणे किंवा अन्य बचावकार्याचे थेट प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळे अनेकदा घटनास्थळी बचावकार्याला वेळ लागतो. जवानांना अत्याधुनिक प्रशिक्षणाचा अभाव असल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात.  या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज येथे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारणीचा निर्णय घेतला असून, यासाठी ‘सिम्युलेटर टॉवर’ची उभारणी केली जाणार आहे.

घटनांची तीव्रता कमी होईल

गेल्या तीन वर्षांत मुंबईत आगीच्या १३ हजार घटना घडल्या. यामध्ये ६५ जणांचा मृत्यू झाला.  या वर्षांत आगीच्या ३,२०० पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. दर महिन्याला लहान-मोठ्या स्वरूपातील आगीच्या ४०० घटना घडतात. यामुळे सिम्युलेटरद्वारे उत्तम प्रशिक्षण मिळाल्यास त्याचा फायदा या घटनेची तीव्रता कमी करण्यासाठी, बचावकार्य अधिक चांगले होण्यासाठी होईल. विशाखापट्टणम आणि लोणावळा येथे संरक्षण दलाकडून जवानांच्या प्रशिक्षणासाठी सिम्युलेटर टॉवर उभारले आहेत.

बोगद्यातील घटना आणि बचाव प्रशिक्षण

  • इमारती, वाहनांना आग लागल्यास तसेच, गॅसगळतीमुळे आग लागल्यास त्याच्यावर नियंत्रण कसे मिळवायचे प्रशिक्षण या सिम्युलेटर टॉवरमध्ये दिले जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली. यासाठी आगीच्या घटना, तसेच गॅसगळतीच्या घटना प्रत्यक्ष दाखवल्या जाणार आहेत.
  • विजेच्या तारांना आग लागली, तर नेमके काय करावे हेसुद्धा प्रशिक्षणाद्वारे दाखवले जाईल. याशिवाय सिम्युलेटर टॉवरमध्ये एक मोठा बोगदाही तयार केला जाणार आहे.
  • एखाद्या बोगद्यात घटना घडली, तर त्यातून बचावकार्य कसे करावे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कामासाठी कंत्राटदाराची निवड केली आहे. एक ते दीड वर्षात काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
टॅग्स :अग्निशमन दलमुंबई