अभिलाषा पाटीलची चटका लावून जाणारी ‘एक्झिट’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 01:03 AM2021-05-07T01:03:49+5:302021-05-07T01:04:21+5:30

डोंबिवलीत झाले आकस्मिक निधन

Abhilasha Patil's 'Exit' in corona pandemic | अभिलाषा पाटीलची चटका लावून जाणारी ‘एक्झिट’

अभिलाषा पाटीलची चटका लावून जाणारी ‘एक्झिट’

Next

राज चिंचणकर

मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे मनोरंजन क्षेत्रातील कुणी ना कुणी काळाच्या पडद्याआड जात  आहे. चित्रपट, रंगभूमी, मालिका, जाहिरात अशा विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी बजावणारी; गोड चेहरा लाभलेली युवा अभिनेत्री अभिलाषा पाटील हिचे कोरोनाने मंगळवारी रात्री डोंबिवली येथे अकस्मात निधन झाले आणि या क्षेत्रातील सर्वांनाच मोठा धक्का बसला. ‘प्रवास’, ‘बायको देता का बायको’, ‘छिछोरे’ आदी चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका रंगवणाऱ्या अभिलाषाची एक्झिट सर्वांना चटका लावून जाणारी ठरली आहे. अभिलाषाला काही रंगकर्मींनी वाहिलेली ही श्रद्धांजली...

प्रवासाची एवढी घाई का?
मी दिग्दर्शित केलेल्या तीन नाटकांमध्ये तू काम केले होतेस. एका अभिवाचन स्पर्धेतही माझ्यासोबत भाग घेतला होतास. डोंबिवलीहून धावतपळत तू तालमीला यायचीस. तुला हमखास उशीर व्हायचा. पण कामाला सुरुवात केलीस की त्यात समरस होऊन जायचीस. खूप स्वप्ने होती तुझ्या डोळ्यांत. मेहनत घ्यायचीही तयारी असायची तुझी. आत्ता आत्ता कुठे छान कामे मिळायला सुरुवात झाली होती तुला. आनंदात होतीस. मग एवढी का घाई केलीस अभिलाषा या प्रवासाची? कसे व्यक्त व्हावे हेच कळेनासे झाले आहे.
- हेमंत भालेकर (लेखक-दिग्दर्शक)

अस्वस्थ करणारी घटना  
आपल्या खूपदा भेटी झाल्या, गप्पा झाल्या, शूटिंगसाठीचा भयंकर प्रवास हा आपल्या गप्पांचा महत्त्वाचा विषय. मुलाची दहावी होईपर्यंत मुंबईला शिफ्ट व्हायचे नाहीय, असे म्हणत हसतखेळत शूटिंगसाठी तुझा पहाटे लवकर उठून प्रवास व्हायचा. १०-१२ दिवसांपूर्वी मी तुला सतत फोन करणे, तो न उचलला जाणे, तुला कोरोना झाला असेल अशी मला शंका येणे, मग खात्री वाटून तू बरी होशीलच असा माझा मला विश्वास वाटणे, असे सगळे आठवतेय. पण तुझे हे असे अचानक जाणे मात्र खूपच अस्वस्थ करतेय.
- मिलिंद अधिकारी (अभिनेता)

विश्वासच बसत नाही 
खूप खूप सह्रदयी सहकलाकार अभिलाषा पाटील. विश्वासच बसत नाही या बातमीवर. अक्षरशः दहा ठिकाणी चौकशी केली. वाटले, कुणीतरी सांगेल, अहो नाही, ती बातमी खोटी आहे, अफवा आहे. पण दुर्दैवाने बातमी खरी ठरली. काय बोलावे ते कळत नाही.
- संजय कुलकर्णी (अभिनेता)

जाण्याचे वयच नव्हते
आता खरेच हलून जाणे वाढायला लागले आहे. अभिलाषा पाटील म्हणजे उत्तम अभिनेत्री, भाषेवर उत्तम पकड, भरपूर वाचन करणारी. आमच्या अभिवाचन स्पर्धेतही दोन वेळा उत्तम अभिवाचक म्हणून बक्षीस मिळवले होते. हिंदी, मराठी मालिका, चित्रपट असे बरेच काही सुरू होते तिचे. दोन-तीन वेळा तिने स्वतःहून ठरवूनही अचानक ठरलेल्या शूटिंगमुळे आमच्या ‘चला, वाचू या’मध्ये सहभागी होऊ न शकलेली अभिलाषा. काही वयाने अधिक असणारे जात आहेत; मात्र अभिलाषाचे वय काही जाण्याचे नव्हते.
- श्रीनिवास नार्वेकर 
(अभिनेता-दिग्दर्शक)

Web Title: Abhilasha Patil's 'Exit' in corona pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.