Join us  

अबब...चोर पतीला वाचविण्यासाठी तिने घेतला ४ पोलिसांचा चावा, गोवंडीतील घटना

By मनीषा म्हात्रे | Published: December 09, 2017 5:50 AM

नवरा घरफोड्या करून आठवड्याला पैशांसह महागडे दागिने आणतो, हौस भागवतो, त्याच्यामुळे ऐशआरामाचे जीवन जगता येते, म्हणून चोर पतीसाठी काहीही करण्यासाठी ती तयार झाली

मुंबई : नवरा घरफोड्या करून आठवड्याला पैशांसह महागडे दागिने आणतो, हौस भागवतो, त्याच्यामुळे ऐशआरामाचे जीवन जगता येते, म्हणून चोर पतीसाठी काहीही करण्यासाठी ती तयार झाली. दारात पतीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोर तिने मुलाच्या गळ्याभोवती चाकू धरला. ‘खबरदार माझ्या पतीला हात लावला तर... मुलाचा गळा चिरेन,’ अशी धमकी देत, तिने पोलिसांना हाकलून लावले. त्यानंतर, सावधगिरी म्हणून पोलिसांनी चोर पतीला रस्त्यातच पकडले. मात्र, त्या वेळीही त्याच्यासोबत असलेल्या पत्नीने तब्बल चार पोलिसांच्या हाताचा कडाडून चावा घेत, चोर पतीला पळून जाण्यास मदत केली. गोवंडीतील या चोर नवरा आणि चावेबाज पत्नीने पोलिसांना अक्षरश: जेरीस आणले. अखेर पोलिसांनी तिला पकडून गजाआड केले.यास्मिन खान (२३) असे या चावेबाज पत्नीचे नाव आहे. ती गोवंडी परिसरात पती आतिक सुबानअली खान (२५) आणि ४ वर्षांच्या मुलासोबत राहते. देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतच आतिकवर २७ घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. नुकत्याच घडलेल्या चार घरफोड्यांच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. यापूर्वी आतिकला अटक झाली. त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल झाले. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर तो दिलेल्या तारखेला, तसेच तपासाला हजरच राहात नसल्याने, कुर्ला न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले आणि येथूनच सुरू झाल्या, त्या चोर नवरा आणि चावेबाज पत्नीच्या नाट्यमय घडामोडी.आतिकच्या अटकेसाठी पोलिसांनी घर गाठले. दारात पोलिसांना पाहून तिने पतीला वाचविण्यासाठी पोटच्या मुलाभोवती चाकू धरला. पतीला हात जरी लावला, तरी याचा गळा चिरून टाकण्याची धमकी दिली. चिमुरड्याच्या सुरक्षेला प्राधान्य देत, पोलीस तेथून निघून गेले. त्यानंतर, पोलिसांनी आतिकला बाहेरच गाठायचे ठरविले.आतिकचा शोध सुरू असताना, देवनार पोलीस ठाण्याचे शिपाई मुरारजी जनार्दन गारळे (३७) हे सहकारी गलांडे यांच्यासोबत बुधवारीकुर्ला न्यायालयातून पोलीस ठाण्याकडे जातअसताना गोवंडी येथील लोखंडे मार्ग परिसरात एका रिक्षाच्या कडेला आतिक फोनवर बोलत असल्याचे त्यांनी पाहिले. तो एकटाच होता. त्यांनी त्वरित वरिष्ठांना या संदर्भात माहिती देत, आतिकला पकडण्यासाठी त्याच्या दिशेने धाव घेतली. त्याला ताब्यातही घेतले. त्याबरोबर, आतिकने पत्नीच्या नावाने धावा सुरू केला. त्याचा आवाज ऐकून रिक्षाच्या पलीकडे असलेली आतिकची पत्नी यास्मीन आणि सासरा हमीद मन्सुर तेथे धावतच आले. यास्मीनने गारळेंची कॉलर पकडली, तर मन्सुरने त्यांना धक्काबुकी केली. पोलीस तिला समजावत असतानाच, तिने पतीला पकडलेल्या गारळे यांच्या हाताचा कडकडून चावा घेतला. त्यामुळे ते खाली कोसळले. हीच संधी साधून आतिक सासºयासोबत पसार झाला. मात्र, पोलिसांनी यास्मिनला तेथून जाऊ दिले नाही, तीदेखील ऐकायला तयार नव्हती. पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होती. ते पाहून एका पोलिसाने तिच्या नकळत मोबाइल व्हॅन मागविली आणि काही क्षणात महिला पोलीस हवालदार तेथे दाखल झाल्या. तासाभराने तिला कसेबसे व्हॅनमध्ये बसविले. व्हॅनमध्ये तिने महिला हवालदार जगताप यांचाही चावा घेतला. जगताप यांनी रक्ताळलेल्या हाताने तिला पोलीस ठाण्यात आणले. येथे आल्यानंतर तिला आवरण्यासाठी महिला हवालदार जगदाळे आणि जाधव या दोघी पुढे आल्या. त्या वेळी या दोघींच्या हातातून रक्त येईपर्यंत ती त्यांना चावली. तिला काहीही करून सुटायचे होते. तिच्या गोंधळाने पोलीस ठाणेही हादरून गेले.अखेर सरकारी कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळ करण्याच्या गुन्ह्यांत देवनार पोलिसांनी तिला गजाआड केले. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.मुलाच्या गळ्याभोवतीही ठेवला चाकूपकडण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोर तिने स्वत:च्या ४ वर्षांच्या मुलाच्या गळ्याभोवती चाकू धरला. ‘खबरदार माझ्या पतीलाहात लावला तर... मुलाचा गळा चिरेन,’ अशी धमकी पोलिसांना दिली. त्यानंतर, सावधगिरी म्हणून पोलिसांनी चोर पतीलारस्त्यात पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तिने चार पोलिसांच्या हाताचा कडाडून चावा घेतला. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिला गजाआड केले.जामिनासाठी न्यायालयात धावशुक्रवारी तिने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, अद्याप तिच्या जामिनावर सुनावणी झालेली नाही.

टॅग्स :गुन्हापोलिसचोरी