मनीषा म्हात्रे -
मुंबई : एकीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची चर्चा सुरू असताना, विक्रोळीत एका कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यांनी ‘साहेबांचे लक्ष आहे’ असे म्हणत गुलाल उधळला, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला. पण, हा आनंद क्षणिक ठरला. अवघ्या तासाभरात उमेदवारी मागे घेण्यात आल्याने पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्ता मागेच राहिल्याचे चित्र समोर आले. विक्रोळीतील मनसे शाखा अध्यक्ष संतोष देसाई यांच्याबाबत हा अजब प्रकार घडला.
गेल्या आठ वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे देसाई प्रभाग क्रमांक ११९ मधून इच्छुक होते. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना मंगळवारी रात्री फोन करून एबी फॉर्म दिला. कार्यकर्त्यांसह त्यांनी फॉर्म स्वीकारला. परिसरात फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. आरती ओवाळण्यात आली आणि जल्लोषात देसाई यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. पण, हा आनंद फार काळ टिकला नाही. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा त्यांना फोन आला. उद्धवसेनेकडून स्थानिक उमेदवार देण्याची मागणी झाल्याचे सांगत एबी फॉर्म परत करण्यास सांगण्यात आले. जड अंतःकरणाने देसाई यांनी फॉर्म परत केला.
“उमेदवारी परत घेतली याचे वाईट वाटते, पण राजसाहेबांच्या आदेशापुढे काहीच नाही. आदेशाचे पालन करणार,” अशी प्रतिक्रिया संतोष देसाई यांनी दिली. या प्रभागातून आता विश्वजित ढोलम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत ते विक्रोळीत मोठ्या फरकाने पराभूत झाले होते.
Web Summary : MNS worker in Vikhroli celebrated receiving candidacy, only to have it revoked an hour later. Senior leaders cited demands from Uddhav Sena as reason, leaving the loyal worker disappointed but resigned to party orders. Another candidate was selected.
Web Summary : विक्रोली में एमएनएस कार्यकर्ता ने उम्मीदवारी मिलने का जश्न मनाया, लेकिन एक घंटे बाद रद्द कर दी गई। वरिष्ठ नेताओं ने उद्धव सेना की मांगों को कारण बताया, जिससे वफादार कार्यकर्ता निराश हो गए लेकिन पार्टी के आदेशों के आगे झुक गए। एक और उम्मीदवार चुना गया।