Join us  

आरे : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 7:04 PM

दाखल गुन्हे पुढच्या दहाच दिवसात प्रक्रिया पूर्ण करून मागे घेतले जातील.

मुंबई : आरे येथील मेट्रो-३ च्या कारशेड विरोधात आंदोलन पुकारणा-या आंदोलकांसह या विषयाशी निगडीत ठिकठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे पुढच्या दहाच दिवसात प्रक्रिया पूर्ण करून मागे घेतले जातील, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आरे संवर्धन समितीच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी दिले. तर आरे आंदोलकांना दिलासा दिल्याप्रकरणी शिष्टमंडळाकडून आव्हाड यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

४ ऑक्टोबर २०१९ रोजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने रात्री आरेमधील मेट्रो-३ साठी झाडे कापण्यास सुरुवात केली. यास येथील पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. मात्र यावेळी २९ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या आंदोलकांमध्ये अनेकजण विद्यार्थी, गृहिणी, आदिवासी समाजातील कार्यकर्ते आहेत. याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी देखील येथे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांच्यावरही कारवाई झाली होती. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडी सरकारतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ डिसेंबर २०१९ रोजी आरे आंदोलकांवरील गुन्हे माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. २ डिसेंबर २०१९ रोजी याबाबत शासन निर्णय जाहीर झाला. परंतु प्रत्यक्षात हा निर्णय कागदावरच राहिला.

गेले १० महिने या निर्णयाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र अंमलबजावणी झाली नाही. या कारणात्सव आंदोलक विद्यार्थी, गृहिणी, आदिवासी यांना नाहक जाचाला सामोरे जावे लागत आहे. काहींना नोकरी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत.  तर काहींना पासपोर्ट काढण्यासाठी तर काहींना घर मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. गुन्हे दाखल असल्याने पोलीस तपासणी शिवाय यापैकी कोणतेही काम होत नाही.

----------------------

आरे संवर्धन समितीच्या शिष्टमंडळाने जितेंद्र आव्हाड यांची भेट याबाबत घेतल्याचे समितीचे रोहित जोशी यांनी सांगितले. भेटीवेळी आंदोलकांनी आपल्या अन्यायावरील पाढा वाचला. आपण स्वत: आंदोलक असल्यामुळे आमच्या भावना आपणास माहित आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढवा, अशी विनंती केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत आव्हाड यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान, यावेळी आरे आंदोलक अमृता भट्टाचार्य यांनी आरे आंदोलनात वेळोवेळी दाखल झालेल्या इतर गुन्ह्याबाबतही माहिती दिली.

टॅग्स :आरेमेट्रोराज्य सरकारउद्धव ठाकरे