Join us

पालिकेच्या अधिकाऱ्यांवर ‘विशेषाधिकाराचा हक्कभंग’ प्रस्ताव आणणार - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 06:48 IST

परिमंडळ १ ते ५ मध्ये स्ट्रीट फर्निचर बसविण्यासाठी २६३ कोटींचा खर्च करण्यात आला. यासाठी राबविलेली निविदा प्रक्रिया फसवी असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई : महापालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाकडून स्ट्रीट फर्निचर उभारणीच्या निविदेत २६३ कोटींचा घोटाळा झाल्याचे एप्रिलमध्ये स्पष्ट केल्यानंतर पालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या निविदांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात पालिकेच्या अधिकाऱ्यांवर ‘विशेषाधिकाराचा हक्कभंग’ प्रस्ताव आणणार असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  

परिमंडळ १ ते ५ मध्ये स्ट्रीट फर्निचर बसविण्यासाठी २६३ कोटींचा खर्च करण्यात आला. यासाठी राबविलेली निविदा प्रक्रिया फसवी असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पालिकेत नगरसेवक नसल्याने जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत २६ एप्रिलला  प्रशासनाकडे  स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. शहर सौंदर्यीकरणात झालेल्या घोटाळ्याप्रमाणे स्ट्रीट फर्निचर घोटाळा असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :आदित्य ठाकरे