Aaditya Thackeray: उदय सामंत यांच्या नेतृत्वात सेनेचे २० आमदार भाजपात जाऊ शकतात, असा दावा उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर दावोसमध्ये असलेल्या उद्योगमंत्र्यांनी गेल्या १५ दिवसांत किती आमदार आणि खासदार भेटून गेले याचा आकडाच सांगितला आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना टीका केली आहे.
ठाकरे गटाच्या ४, काँग्रेसच्या ५ आमदारांनी व ठाकरे गटाच्या ३ खासदारांनी गेल्या १५ दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. याचबरोबर ठाकरे गटाचे १० माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे शिवसेनेत सामील होतील, असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य केले.
EVMने संख्याबळ दिले, तरी तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण...
उदय सामंत यांच्या दाव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा करा. ईव्हीएमने तुम्हाला संख्याबळ दिले तर काम करा. भाजपा आणि महाराष्ट्रात आणलेले राजकारण हे विषाचे फोडाफोडीचे आहे. उदय सामंत शिंदे गटाचे आमदार फोडायच्या विचारात आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे का? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे का ? आठवा वेतन लागू करणार आहात का? त्यांना पालकमंत्री नाही, मालकमंत्री व्हायचे आहे. दादागिरीला मुख्यमंत्री झुकत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.