Join us  

भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 6:04 AM

भाजपने नकली संतान म्हटले हा माझ्या आजोबांचा- आजीचा हा अपमान आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मनमोहन सिंग सरकार इंटरनॅशनल फायनान्स सेंटर बीकेसीत आणणार होते. त्याचवेळी भाजपने बीकेसीतील तोच भूखंड बुलेट ट्रेनसाठी प्रकल्पाला दिला व तिथले फायनान्स सेंटर गुजरातला पाठविले. इथल्या तरुणांच्या हक्काच्या नोकऱ्या पळविल्या. हे भाजप सरकार पुन्हा एकदा डोक्यावर बसले तर मंत्रालयही गुजरातला पाठविले जाईल, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 

मुंबई दक्षिण मध्यचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी आदित्य यांच्या सभेचे प्रतीक्षानगर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ठाकरे यांनी राज्यातील उद्योगधंदे परराज्यात नेल्याचा आरोप करून भाजपवर हल्ला चढविला. राज्यातील तरुणांना रोजगार मिळाला नाही. मविआचे सरकार असताना जगाचे अर्थचक्र बंद पडले होते, त्यावेळी आमच्या सरकारने साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली, असे ते म्हणाले. सत्तेत आल्यावर सहा हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांची चौकशी केली जाईल. त्यात मुख्यमंत्री, पालिका आयुक्त व इतर दोषी अधिकाऱ्यांचा समावेश असेल, असे आदित्य म्हणाले. 

‘हा अपमान सहन केला जाणार नाही’

भाजपने नकली संतान म्हटले हा माझ्या आजोबांचा- आजीचा हा अपमान आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी भांडुपमधील सभेत केला. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

 

टॅग्स :आदित्य ठाकरेआदित्य ठाकरेमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबईलोकसभा निवडणूक २०२४